Breaking News

ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार मुलाचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 30 - कानात हेडफोन लावलेल्या दुचाकीस्वाराला ट्रॅव्हल्सचालकाने हॉर्न वाजवल्यानंतरही ऐकू आले नाही. तिसरा हॉर्न कानी पडल्यानंतर दुचाकीस्वार मुलगा भांबावला व बाजूला जाणार्‍या पादचार्‍यांना धडकला. रस्त्यावर कोसळल्यानंतर मागून आलेल्या ट्रॅव्हल्सने त्याला चिरडले. यात त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी ता. 29 सकाळी सातच्या सुमारास घडली. 
मुकुंदा सदाशिव टाक वय-17, रा. शिवशंकर कॉलनी, जवाहरनगर असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. सकाळच्या वेळी त्याची बहीण शहानुरमियॉ दर्गा चौकाच्या दिशेने मॉर्निंगवॉक करीत होती. तिच्या मागे तो दुचाकीवरून जात होता. त्या वेळी मागून आलेल्या के. बी. ट्रॅव्हल्सच्या लक्झरीने हॉर्न दिल्यानंतरही त्याला आवाज आला नाही. तिसरा आवाज कानी पडताच तो घाबरला, व डाव्या बाजूने जाणार्‍या वृद्धांना धडकला. यात वृद्धही किरकोळ जखमी झाले. ट्रॅव्हल्सखाली आल्याने चिरडून त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, वाहतूक निरीक्षक अविनाश आघाव घटनास्थळी पोचले. त्यांनी मुलाला घाटी‘ त पाठवले. मात्र, डॉक्टरांनी मुकुंदाला मृत घोषत केले. दरम्यान अपघातग्रस्त ट्रॅव्हल्ससह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी चालक मोहम्मद जलील मोहम्मद पाशुमियॉ वय- 51, रा. शंभुनगर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.