’एमआयएम’ लढणार 85 नगरपालिका
औरंगाबाद, दि. 30 - राज्यात होणार्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने कंबर कसली आहे. हैदराबादच्या धर्तीवर पक्षाने राज्यभरात निवडणूक लढविण्यासाठी पक्षांतर्गत सर्वेक्षण केले असून, त्यानुसार 85 नगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. जनतेमधून नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय कायम राहिल्यास 20 नगरपालिकेत नगराध्यक्ष विजयी करण्याचे पक्षाचे लक्ष राहणार आहे. लातूर, सोलापूर, मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. महाराष्ट्रात पकड घट्ट करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कोअर कमिटीची स्थापना करून प्रत्येक जिल्हा, शहरात, तालुक्यात कार्यकारी जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यभरात कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर आता एमआयएमने नगरपालिकांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे.
