Breaking News

कार झाडावर आदळून मुंबईचे दाम्पत्य ठार

कराड, दि. 13 -  पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील मालखेड फाटा येथे टँकरला धडक दिल्यानंतर कार झाडावर आदळून मुंबई येथील प्रवीण मोहन तुळसकर (वय 50) व प्रिया प्रवीण तुळसकर (वय 45. रा. गोकुळधाम, गोरेगाव, मुंबई) हे दाम्पत्य जागीच ठार झाले. तर त्यांची प्रथमेश (वय 25) व पार्थ (वय 23) ही दोन मुले गंभीर जखमी झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रवीण तुळसकर हे दोन दिवसांपूर्वी गोवा येथे गेले होते. तेथून  ते कारने मुंबईकडे जात होते. मालखेड फाटा येथे आल्यानंतर त्यांच्या कारने पुढील टँकरला धडक दिली. त्यानंतर कार सेवारस्त्यावरील झाडावर आदळली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. ग्रामस्थ व महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचार्‍यांनी चौघांना कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी प्रवीण तुळसकर व प्रिया तुळसकर यांचा मृत्यू झाला. तर दोन्ही मुले गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.