बीएसएनएल देणार 1199 रूपयांमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि इंटरनेट
नवी दिल्ली, दि. 16 - बीएसएनएलने ब्रॉडबॅन्ड ग्राहकांसाठी 1 हजार 199 रूपयांमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि इंटरनेट सुविधा देण्याची घोषणा केली आहे. या नव्या प्लॅनला बीबीजी कॉम्बो अनलिमिटेड 1199 असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत ग्राहकांना 2 एमबीपीएसचा वेग मिळणार आहे. संपूर्ण महिन्यात इंटरनेटचा वेग कोणत्याही प्रकारे कमी केला जाणार नाही. याव्यतिरिक्त संपूर्ण देशात मोबाईल आणि लँडलाईनवर केल्या जाणा-या कोणत्याही कॉल्सना शुल्क द्यावे लागणार नाही. हा प्लॅन घेणा-या कोणत्याही ग्राहकांना इन्स्टॉलेशन शुल्कदेखील द्यावे लागणार नसल्याचे बीएसएनएलकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वीही बीएसएनएलने ब्रॉडबॅन्ड ग्राहकांना 249 रूपयांमध्ये 300 जीबी डेटा देणार असल्याची घोषणा केली होती.