Breaking News

वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा आज लिलाव

सांगली. दि. 24 - येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील निवृत्त कर्मचार्‍यांच्या थकीत देण्यांच्या वसुलीसाठी बुधवारी कारखान्याच्या मालमत्तेची जाहीर लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. ही कारवाई महसूल विभागाकडून होणार असल्याचे मिरजेचे प्रभारी तहसीलदार शेखर परब यांनी सांगितले.
वसंतदादा कारखान्याकडे निवृत्त कर्मचार्‍यांची सुमारे 34 लाख 94 हजार 412 रुपयांची देणी थकीत आहेत. या थकीत देण्यांच्या वसुलीसाठी निवृत्त कर्मचार्‍यांनी कारखान्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कारखान्याने ही देणी त्वरित द्यावीत, असा आदेश न्यायालयाने दिला. मात्र, आदेश होऊनही कारखान्याकडून कर्मचार्‍यांना थकीत देणी मिळाली नसल्याने, न्यायालयाने कारखान्याची मालमत्ता विक्री करुन ही देणी वसूल करावीत, असा आदेश महसूल विभागाला दिला आहे.
या आदेशानुसार वसुलीसाठी कारखान्याच्या मालकीच्या सर्व्हे नं. 192/2 ब या क्षेत्रामधील 1700 चौरस मीटर जमिनीची उद्या सकाळी अकरा वाजता जाहीर लिलावाव्दारे विक्री होणार आहे.  ही कारवाई महसूल विभागाकडून केली जाणार आहे. सांगलीच्या राजवाडा येथील मंडल कार्यालयात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे परब यांनी सांगितले.