Breaking News

गावातील शाळा टिकली पाहिजे आणि खेड्यातील मुले शिकली पाहिजे!

गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची विद्यार्थी केंद्रीत कार्यपध्दती ठरतेय गुणवत्तेची नांदी!

परभणी/ प्रतिनिधी, दि. 24 - पूर्णा तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला यशाच्या उंच शिखरावर घेवून जाण्यासाठी कर्तव्य दक्षतेतून जिवाच रानं करणारे गटशिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांची शाळा-विद्यार्थी केंद्रीत कार्यपध्दती तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची नांदी ठरत असल्याच्या भावना तालुक्यातील विद्यार्थी पालकांसह नागरीक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातीलच नावकी गावातील भुमीपुत्र असलेल्या विठ्ठल भुसारे यांनी गटशिक्षण अधिकारी म्हणुन हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीतुन सेवेला सुरुवात केली. साहित्यीक क्षेत्राचे बाळकडूच मिळालेल्या भुसारे यांनी आपल्या कर्तव्यातुन साहित्यांने दिलेली शिकवण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील सेवार्थींच्या अंगवळणी पाडली आहे. शाळा व्यवस्थापनात लोकांचा सहभाग ही शाळेची सकारात्मक बाजु असुन शाळा ही राजकारण विरहीत व्यवस्थापीत झाली पाहिजे ही गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची आग्रही भुमिका गावकर्‍यांना एखाद्या संतवचनाची ब्रिदावली असल्याचे भासले. कारण शाळेच्या कारभारातच राजकारणाचा डाव मांडण्यात आल्याने तालुक्यातील अनेक शाळांच्या व्यवस्थेचे तिन तेरा झाले होते. आपल्या कर्तव्याची आणि अधिकाराची योग्य अशी सांगड घालुन तालुक्यात सैराट झालेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांचे विचाराच्या चौकटीतुन पुनर्गठन केले. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावातील शाळा व्यवस्थापन समित्या विद्यार्थी-शाळा केंद्रीत असुन त्यांच्या कार्यातुन खर्‍या लोकशाहीचा अविष्कार होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे. तालुक्यातील गावा-गावात स्वतः जावुन तेथील गावकर्‍यांसोबत संवाद साधणार्‍या गट शिक्षणाधिकार्‍यांची पहिल्यांदाच ओळख तालुक्यातील नागरीकांना होत असल्याने शिक्षण क्षेत्रातील उणिवा भरुन निघत असल्याचे समाधान ही नागरीक व्यक्त करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील सर्व पैलुंचा योग्य वापर होणे अपेक्षीत असुन या क्षेत्रात काम करणार्‍यांनी आपल्या सेवेचा अर्थ समजुन कार्य करण्यास प्राधान्य दिले पाहिजे ही गटशिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांची शिकवण तालुक्यातील शिक्षकांना दिशा देणारी ठरली आहे. शाळा- विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असल्याने याची वृक्षाप्रमाणे जपवणुक करुन योग्य विकास घडवून आणण्याची जबाबदारीच या क्षेत्रातील लोकांवर असल्याने त्यांनी सर्वप्रथम स्वतःचे योगदान देण्यास सुरुवात करावे ही भुसारे यांची आग्रही भुमिका तालुक्यातील शिक्षणप्रेमींच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे गावा-गावात शिक्षण प्रेमींची फळी निर्माण झालेली असुन शाळांतील उणिवा गावकर्‍यांच्या माध्यमातुन सोडविण्यात गटशिक्षण अधिकारी भुसारे चांगल्या प्रकारे यशस्वी होत असल्याचे मत शिक्षणतज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे. शासनाच्या कोणत्याही शैक्षणिक कल्याणकारी योजना असतो त्या योजनेची अंमलबजावणी करणे ही कर्तव्याची बाजु जाणून भुसारे स्वतः होवून गावा-गावात जावून जागर करत आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या जागरातुन शिक्षणात लोकांचा होत असलेला सहभाग यातुन आपली शाळा व आपली मुले ही भावना निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक गावांतुन लाखो रुपयांचा निधी गोळा करुन गावा-गावातील शाळा ई-लर्निंग झाल्या पाहिजेत. ज्ञानरचनावाद वाढीस लागला पाहिजे व विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण मिळाले पाहिजे हा शासनाचा मानस यशस्वीपणे पुर्ण करण्याचा प्रयत्न गटशिक्षण अधिकारी भुसारे यांच्याकडून होत असल्याने पुर्णा तालुक्यातील शाळांची ज्ञानमंदिर म्हणुन काळजी घेणार्‍यांचा प्रयत्न सर्वत्र सुरु आहे. गावा-गावात शिक्षणाचा जागर घडवून लोकांना संतवचनांची उदाहरणे देवून महापुरुषांची शिकवण आत्मसात केल्यानेच विकासपूर्ती होवू शकते ही सकारात्मक बाजु मांडण्यास भुसारे कधीच विसरत नाहीत. ग्रामीण भागातील शिक्षणाची व्यथा जाणुन घेवून शिक्षणाच्या आय चा घो म्हणण्याची वेळ न येण्यासाठी परस्थितीनुसार शिक्षणाची पावित्र्यता वाढविण्याचा प्रयत्न गुरुजींनी केला पाहिजेे. यासाठी गटशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी स्वतः शाळेत येवून आपल्या कनिष्ठ सहकार्‍यांना आधार देण्यास केलेली सुरुवात ही कर्तव्य करणार्‍या हजारों शिक्षकांचा आत्मविश्‍वास वाढविणारी ठरली आहे. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असो की खाजगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन चालणारे विद्यालय या दोन्हीचा समानतेने विचार करणारे गटशिक्षणाधिकारी सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनले आहेत. दरम्यान गटशिक्षण अधिकारी यांनी हाती घेतले काम हे दिर्घकालीन प्रक्रिया असुन आपल्या तिन वर्षात पुर्णा तालुक्यातील शिक्षणक्षेत्राचा कायापालट करण्याचा संकल्प असल्याचे अनेक ठिकाणी त्यांनी स्पष्ट केले आहे.