Breaking News

अवैध धंद्यांना आळा घालाः आ.डॉ.शशिकांत खेडेकर

सिंदखेडराजा (प्रतिनिधी), दि. 24 - दे.राजा शहर व सिंदखेडराजा शहरासह ग्रामीण भागामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉ.शशिकांत खेडेकर यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेवून अवैध देशी दारूची दुकाने, वरली मटका, गुटखा विक्रीसह इतरही काही अवैध धंदे तातडीने कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी केली. शहरासह ग्रामीण भागांमध्ये अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. सिंदखेडराजा येथील फिल्टर प्लँटजवळ महामार्गावर फारमोठा क्लब दिवसाढवळ्या सुरू असून दररोज मराठवाड्यातील जालना, औरंगाबादसह बुलडाणा जिल्ह्यातील क्लबसम्राट येथे क्लब खेळण्यासाठी येतांना दिसतात. वरली मटका, गुटखा, अवैध दारू यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. यातून दारू पिणार्‍याचे प्रमाण वाढले असून आत्महत्या, अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. अवैध धंद्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले. दारू, जुगार, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे अवैध धंद्यांना आळा घालून ते तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे केली. त्यावर यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्याचे आश्‍वासन गायकवाड यांनी यावेळी दिले.