Breaking News

काँग्रेस व राष्ट्रवादीचा महापालिकेवर भव्य मोर्चा

। आयुक्तांच्या दालनात मोर्चेकरांकडून धूर फवारणी । महिलांनी दिल्या दुषित पाण्याच्या बाटल्या । निषेध व घोषणाबाजी

अहमदनगर (प्रतिनिधी) । 24 - शहर व उपनगरात घाणीच्या साम्राज्यामुळे पसरलेले साथीचे रोग, विस्कळीत आणि दुषित पाणी पुरवठा, रस्त्याची झालेली दुरावस्था याकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष तसेच महापालिकेच्या गळथान कारभाराच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा नेऊन मनपा आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनात धूर फवारणी केली. तर संतप्त महिलांनी आयुक्तांना दुषित पाण्याच्या बाटल्याचा हार घातला. यावेळी मोर्चेकरांनी मनपा प्रशासनाच्या विरुध्द जोरदार घोषणाबाजी करुन निदर्शने केली. त्यामुळे मनपा परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
नागरिकांच्या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केले. मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध संस्था, संघटनाच्या पदाधिकार्‍यांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकर्‍यांनी मनपा प्रशासनातील अधिकार्‍यांबरोबरच पोलिसांची दमछाक केली. महिलांनी अधिकार्‍यांना घेराव घालताच तोफखान्याचे पोलिस निरीक्षक निकाळजे सरसावले. मात्र त्यांचा विरोध झुगारुन महिलांनी त्यांना घेराव घालून धारेवर धरले. या आंदोलनात माजी महापौर अभिषेक कळमकर, अभिजित खोसे, निखील वारे, संपत बारस्कर,कुमार वाकळे, अरिफ शेख, स्वप्निल शिंदे, विजय गव्हाळे, सुनिल कोतकर, संजय झिंजे, उबेद शेख, दिपक सुळ, दिलदारसिंग बीर, सारंग पंधाडे, जितू गंभीर, सुरेश बनसोडे, मोना विधाते, रेश्मा आठरे, अ‍ॅड.शारदा लगड, सविता मोरे, निलीमा गायकवाड, राजश्री मांढरे, साधना बोरुडे, संध्या मेढे, नसीम शेख, अजय चितळे, बाळासाहेब भुजबळ, मुजाहिद कुरेशी, मतीन सय्यद, कलीम सय्यद, प्रकाश भागानगरे, विकी जगताप, समीर बागवान, योगेश खताळ, संजय सपकाळ, अजिंक्य भिंगारदिवे, मुन्ना चमडेवाला, आयुब खान, दगडू पवार, सुरेश मेहतानी, अमित खामकर, अंजिक्य बोरकर, विपुल शेट्टीया, अरविंद शिंदे, निलेश भांगरे, यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
सध्या शहरात गॅस्ट्रो, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया, गोचिडताप, यासारख्या साथीच्या रोगानी थैमान घातलेले असताना मनपा प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाही. नळावाटे रोज दुषित पाणी पुरवठा होतो. शहर व उपनगरात कचर्‍याचे ढिग साचले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याबाबत फक्त घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. त्याचाच उद्रेक मंगळवारी झाला.  मोर्च्याच्या वेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले, मनपातील सत्त्ताधार्‍यांवर आणि महापालिका प्रशासनावर जोरदार टिका केली. वारंवार पाठपुरावा करुनही जनतेचे प्रश्‍न सुटत नसल्याने आंदोलनाची वेळ आली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्ण ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. अशा वेळी प्रशासन नेमके करते तरी काय? सत्ताधार्‍यांनीही राजकारणातून नागरिकांच्या प्रश्‍नाकडे व मुलभूत सुविधाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने जनतेचा रोष वाढत आहे. असे सांगितले. नागरिकांना सोयी-सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ 16 ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. मात्र, कोणत्याही सोयी-सुविधा व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या नसल्याने साथीच्या रोगामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नागरी सुविधा न मिळाल्यास लवकरच मनपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.