Breaking News

मनपाची अतिक्रमण हटाव मोहिम दुसर्‍या दिवशीही सुरुच

। अतिक्रमण धारकांचे साहित्य जप्त । प्रभाग अधिकार्‍यांचाही सहभाग ।

अहमदनगर (प्रतिनिधी) । 24 - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर तसेच वारंवार होणार्‍या वाहतुक कोंडीमुळे तसेच नागरिकांच्या होणार्‍या तक्रारीमुळे महापालिकेच्यावतीने शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहिम मंगळवारी दुसर्‍या दिवशीही राबविण्यात आली. रस्त्याच्या बाजुला अतिक्रमणे हटवून साहित्य काढून न टाकता ते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अतिक्रमण विरोधी पथकाबरोबरच प्रभाग अधिकारी व त्यांचे पथकही सहभागी झाल्याने मोहिमेला बळ आले. यावेळी कोणताही पोलिस बंदोबस्त घेण्यात आला नव्हता. या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांची तारांबळ उडाली.
अतिक्रमणामुळे कोंडलेला वाहतुकाचा श्‍वास मोकळा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमण हटाव धडक मोहिम सुरु करण्यात आली. मंगळवारी सकाळी लालटाकी पासून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. लालटाकी ते दिल्लीगेट पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या टपर्‍या व अतिक्रमणासाठी वापरण्यात आलेले इतर साहित्य जप्त करण्यात आले. मोहिमेत अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे, क्षेत्रिय अधिकारी रिजवान शेख, व देविदास बिज्जा यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पथकाबरोबर प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, मिलींद वैद्य हे सहभागी झाले होते. मोहिम शहरातील इतर भागातही सातत्याने राबविली जाणार आहे. असे इथापे यांनी सांगितले.