Breaking News

आझादी के 70 साल- याद करों कुर्बानी’ प्रचार रॅलीचा शुभारंभ

। राष्ट्रीय जनजागृती निमित्त वाळकीत कार्यक्रम । लेझिम पथकाने गावकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले

अहमदनगर (प्रतिनिधी) । 24 - ’आझादी के 70 साल- याद करों कुर्बानी’ या विशेष प्रचार कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला खासदार दिलीप गांधी यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
नगर तालुक्यातील वाळकी येथे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षपूर्ती निमित्त आझादी के 70 साल- याद करों कुर्बानी या राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार गांधी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी प्राणांचे बलिदान दिले. अनेक देशवासियांच्या बलिदानानंतर प्राप्त झालेले हे स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आपले अनेक सैनिक सीमेवर खडा पहारा देत आहेत. त्यांच्यामुळे आपण शांतपणे जीवन जगू शकतो. अशा सर्वच स्वातंत्र्यसैनिकांची, सैन्य दलातील जवानांची आपण कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवली पाहिजे. प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटली पाहिजे. देशासाठी लढणा-या जवानांविषयीचा आदर कृतीतून दिसला पाहिजे, असेही ते म्हणाले.
या रॅलीत विद्यार्थी-विद्यार्थिनी ऐतिहासिक महापुरुषांच्या पोशाखात सहभागी झाल्या होत्या. तालबध्द आणि शिस्तबध्द लेझीम पथकाच्या तालावरील ही रॅली गावक-यांचे लक्ष वेधून घेत होती. या रॅलीचा समारोप न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमासमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मिहिर कुमार सिंह, भारत सरकारच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या संचालिका प्रभावती आकाशी, जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, भाजपाचे तालुका अध्यक्ष दिलीप भालसिंग, पत्रकार राजेंद्र झोंड, सरपंच संग्राम गायकवाड, न्यू इंगलीश स्कूलचे प्राचार्य सुखदेव कातकडे, विक्रम बोठे, ऋता ठाकूर, प्रा. सुरेखा गांगुर्डे, शरद बोठे, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, अहमदनगरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये आदींसह गावकरी उपस्थित होते.
समारोपाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद वीरजवानांच्या नातेवाईकांचा गौरव करण्यात आला. यावेळी योजनांवर आधारीत प्रश्‍नमंजुषा, याशिवाय निबंध लेखन, रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
या विशेष जनजागृती प्रचार अभियानात देशाच्या स्वातंत्र्य लढयातील थोर व्यक्तिंचे योगदान, या लढ्यात हुतात्मा झालेल्या शहीदांच्या सदैव आठवणींना उजाळा, भारतील स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्यासाठी, 1857 ते 1947 या भारतीय स्वातंत्र्य लढ्याची यशोगाथाविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिवाय केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पवळे यांनी तर आभार प्रदर्शन सदाशिव मलखेडकर यांनी केले. शाळेच्या प्रांगणात जिल्हा परिषद, विविध बँका, कृषी विभाग, आरोग्य, महिला व बाल विकास, स्वच्छ भारत मिशन, खादी उद्योग, उज्जवला गॅस योजना, कौशल्य विकास, पाणीपुरवठा आदी कार्यालयांचे स्टॉल्स् लावण्यात आले होते. पहिल्या दिवशी दि. 22 ऑगस्ट 2016 रोजी आझादी के 70 साल- याद करों कुर्बानी या कार्यक्रमाद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मे आणि थोर नेत्यांची माहिती शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांना मिळावी यासाठी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तिपर लघु चित्रपटाचे आयोजन, देशभक्तीपर गीते आणि मनोरंजनाच्या माध्यमातून या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढयास उजाळा देण्यात आला. जनतेला सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या दोन दिवशीय कार्यक्रमात चित्र प्रदर्शनी, माहिती पट आणि कलापथकाचे आयोजन करण्यात आले होते.