वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पुर्ण होणार : ना.शिंदे
। चिचोंडी पाटील येथे ना.शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण । महाराजस्व अभियानास प्रारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)। 02 - कृषीदिनानिमित्त जिल्ह्यात 19 लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. हे उद्दिष्ट सर्व विभागातंर्गत पुर्ण केले जाईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा शासकीय कार्यक्रम नगर तालुक्यातील चिचोंडीपाटील येथे सकाळी ना. शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महाराजस्व अभियान व लघुपाटबंधारे तलावाची पाहणी केल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील विधान केले.
पुढे ते म्हणाले, राज्यात एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राज्यसरकारने हाती घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यात विद्यार्थी, ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी यांच्या नियोजनातून जिल्ह्यात 19 लाख झाडे लावण्याचे ठरविले होते. त्यानुसार दुपारपर्यंत 1 लाख झाडे लावण्यात आली होती. यासाठी वनीकरण विभागाच्या वतीने विविध झाडांची रोपे उपलब्ध करुन देण्यात आली होती. वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. निवडणुकीच्या निकालाप्रमाणे प्रत्येक तासाला वृक्ष लागवडीची माहिती घेण्यात आली यासाठी सर्व विभाग स्तरावर अधिकारी व कर्मचार्यांना त्या संदर्भात सुचना देण्यात आल्या होत्या. असे त्यांनी सांगितले. अधिक माहिती देतांना ना.शिंदे म्हणाले, नागरिक, विद्यार्थी यांना सुलभतेने सर्व दाखले व रेशनकार्ड वेळेत मिळण्यासाठी महाराजस्व अभियानाला आज सुरुवात करण्यात आली. यासंदर्भात प्रशासनाला सर्व प्रकारच्या सुचना दिल्या आहेत. याबरोबरच भिंगारच्या नागरिकांनी केलेल्या व दिलेल्या निवेदनाप्रमाणे भिंगारमधून जाणारा नॅशनल हायवे 222 चे काम रेंगाळल्यामुळे वाहतुक कोंडीचा त्रास होतो. काम त्वरीत मार्गी लावावे असे सुचविण्यात आले. यासंदर्भात माहिती देतांना ते म्हणाले, एमईएसचे पाईपलाईन हलविण्यासंदर्भात परवानगी मिळाली आहे. मंजूरी मिळाली, त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. याबरोबरच भिंगार बसस्थानक व पोलिस ठाणे यासाठी उपलब्धतेनुसार जागा दिली जाणार आहे. तसेच भोईकोट किल्ला पर्यटनासंदर्भातील अडथळे दूर झाले आहे. पर्यटन व डिफेन्स यामध्ये नुकताच करार झाला असून त्यांनी परवानगी दिली आहे. मालकी त्यांच्याकडेच राहणार असून देखभाल व सुशोभिकरण तसेच ऐतिहासिक वास्तुचे जतन आपल्याला करावे लागणार आहे. असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे उपस्थित होते.
दरम्यान, नगर शहरात विविध ठिकाणी चार हजार रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी निवासस्थान व दारु उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात अधिकार्यानीं वृक्षरोपण केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रातांधिकारी वामन, निवडणुक अधिकारी आनंदकर, तसेच दारु उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री जाधव आदी प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.