Breaking News

शाहू महाराजांच्या नावाचे फक्त राजकारणच

अहमदनगर (प्रतिनिधी)। 02   - भारत भारती या राष्ट्रीय एकात्मियतेसाठी काम करणार्या संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती उत्साहात साजरी झाली. इतिहास संशोधक प्रा.नवनाथ वाव्हळ यांचे यावेळी व्याख्यान झाले. 
प्रा. वाव्हळ यांनी छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलगडला. ते म्हणाले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी अत्यंत प्रभावीपणो छत्रपती शिवाजी महाराजांची गादी चालविली. इंग्रज सरकारचे मांडलीक राजा असूनही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत अनेक मोठे निर्णय घेत समाज सुधारण्याचे महान कार्य केले. त्यांच्या विचाराने महाराष्ट्र आज पुढे जात आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपण जपतो. मात्र अनेकवेळा शाहू महाराजांच्या नावाचे फक्त राजकारणच केले जात आहे, असेही ते म्हणाले.
राजकीय सोयीसाठी व स्वार्थापोटी त्यांच्या नावाचा वापर होतो. मराठा आरक्षणाचा विषय निघतो तेव्हा शाहू महाराजांचे नाव घेणार अनेक लोक आहेत. मात्र भारत-भारती संस्थेचे सदस्य कोणताही स्वार्थ न जपता शाहू महाराजांबद्दल आदर राखत त्यांचा वारसा जपत आहे. अशा संस्था फार कमी आहेत. शाहू महाराजांचे नगरशी जवळून संबंध आहेत. नगर शहराला अनेकदा भेट देऊन त्यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा वसतीगृहाची स्थापना नगरमध्ये केली होती, याची आठवण यावेळी प्रा. वाव्हळ यांनी सांगितली.
भारत भारतीचे अध्यक्ष अशोक मवाळ यांनी भारत भारतीच्या आगामी उपक्रमाबद्दल माहिती दिली. विनायक पवळे, विश्‍वनाथ पोंदे, राजेश पलाई, आर.बी.जोशी, ए.एस.राठोड, राजेंद्र अगरवाल, ईश्‍वरसिंग चौधरी, प्रमोद कासट, हिरालाल पटेल, विशाल पटेल, राजू ढोरे, कौशिक कोठारी, के.के.शेट्टी, हर्ष हरवाणी, रामेश्‍वर बिहाणी उपस्थित होते. विश्‍वनाथ पोंदे यांची रेल्व कमिटीच्या वेस्टन झोन सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. चंद्रशेखर आरोळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश रुणवाळ यांनी आभार मानले.