Breaking News

रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक त्वरीते हटवा : आयुक्त मेहता

मुंबई, दि. 04 - मुंबईच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले पेव्हरब्लॉक काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. तरीही अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनात आले आणि पुन्हा एकदा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रस्त्यांवरील हे पेव्हरब्लॉक काढून त्या जागी डांबरीकरण करण्याचे फर्मान सोडले आहे. रस्त्यांच्या बाजुला अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉकमुळे रस्ते खचण्याचे तसेच खड्डे पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जिथे जिथे म्हणून रस्त्यांच्या भागांमध्ये पेव्हरब्लॉक बसवण्यात आलेले आहेत, ते सर्व काढून टाकण्याचे आदेश नव्याने महापालिका आयुक्तांनी सर्व उपायुक्त तसेच सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.
मुंबईतील अनेक सिमेंट काँक्रीट आणि डांबरी रस्त्यांच्या कामांमध्ये पेव्हरब्लॉकचा एक पट्टा तयार केला जात आहे. रस्त्याच्या कडेला किंवा सिमेंट आणि डांबरीकरणाच्या मधोमध पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. तसेच अनेक चौकांमध्येही पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच रस्त्यांच्या बांधकामांमधून पेव्हर ब्लॉकला हद्दपार केले आहेत. यापुढे एकही रस्ता पेव्हर ब्लॉकचा बनणार नाही,असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शनिवारी झालेल्या सर्व अधिका-यांच्या बैठकीत आयुक्तांनी ज्या ज्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आलेला आहे, ते काढून तो भागावर अस्फाल्टचा वापर करून रस्ता बनवला जावा, असे आदेश दिले आहेत.