Breaking News

रस्त्यांवरील खड्ड्यांत ‘स्वाभिमान’चे वृक्षारोपण

मुंबई, दि. 02 -  ‘आता तरी भाजपा, शिवसेना, महापालिका यांना लाज वाटेल’ अशी चीड व्यक्त करत स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करत लाखो मुंबईकरांच्या वतीने महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाचा निषेध केला. कोटयवधी रुपयांचा निधी खर्चूनही मुंबईकरांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हा निधी कुणाच्या उदरनिर्वाहासाठी वापरला जातोय, असा बोचरा सवाल करीत महापालिकेतील सत्तेचा लाभ वांद्रयातील शिवसेनेचे साहेब, त्यांचे पीए व भाजपाचे वांद्रे येथील अध्यक्ष यांनाच होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


फडणवीस सरकारच्या वतीने राज्यात दोन कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्याच दिवशी ‘स्वाभिमान’ संघटनेच्या वतीने शुक्रवारी सांताक्रूझ पश्‍चिम येथील दौलतनगर चुनाभट्टी सर्कल येथे भररस्त्यात पडलेल्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करून अभिनव आंदोलन करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून स्वाभिमान कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा दोन्ही पक्षांचा जाहीर निषेध केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाला लक्ष्य केले. सध्या शिवसेना-भाजपाचे एकमेकांशी सुरू असलेले भांडण म्हणजे केवळ नाटकबाजी असल्याची टीका त्यांनी केली.
महापालिकेतील सत्तेचा मलिदा जास्तीत जास्त मिळावा यासाठीच या दोघांचे हे नाटक असल्याचे ते म्हणाले. शिवसेना व भाजपा नेते स्थायी समितीमध्ये परस्पर सामंजस्याने टक्केवारीचा मलिदा वाटून घेतात. त्यामुळे त्यांना एकमेकांविरोधात टीका करण्याचा अधिकार नसल्याचेही ते म्हणाले.
पावसाच्या पहिल्या सरीतच मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोटयावधी रुपयांचा निधी खर्चूनही मुंबईकरांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हा निधी कुणाच्या उदरनिर्वाहासाठी वापरला जातो असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. महापालिकेतील सत्तेचा लाभ वांद्रयातील शिवसेनेचे साहेब त्यांचे पीए व भाजपाचे वांद्रे येथील अध्यक्ष यांना होत असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र केवळ त्रास सहन करावा लागत आहे असे ते म्हणाले.
कल्याण डोबिंवली येथील महापालिका निवडणुकीप्रमाणे मुंबईत भांडणाचा देखावा करुन नागरिकांना मुर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र मुंबईकर त्यांच्या या दिखाव्याला भुलणार नाहीत. येत्या निवडणुकांमध्ये त्यांची योग्य ती जागा दाखवून देतील असा विश्‍वासही आमदार नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
रस्त्यावरील हे खड्डे पाहता विकासाच्या बाता करणा-या मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना-भाजपा हे दोन्ही सत्ताधारी पक्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, असा आरोप करीत सत्ताधा-यांना मुंबईतील रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसल्याने त्यांची जाणीव करुन देण्यासाठी आम्ही हे अभिनव आंदोलन करीत असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.