Breaking News

कराड तालुक्यातील शेणोली येथे महिलांची इफ्तार पार्टी

कराड, दि. 2 (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृती म्हणजे विविधतेत एकता असल्याचे म्हंटले जाते. विविध जाती धर्मानुसार त्यांची मंदिरे, धार्मिक स्थळे वेगवेगळी आहेत. मात्र, काल सायंकाळी कराड तालुक्यातील शेणोली येथे जातीय सलोख्याचे अनोखे दर्शन घडले. सर्व जाती-धर्मातील महिलांनी शे
णोली येथील मारुती मंदिराचे प्रांगणात उपस्थित राहून मुस्लिम महिलांसोबत इफ्तार पार्टी साजरी केली. यावेळी कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर व महिला पोलीस अधिकार्‍यांचा ताफा उपस्थित होता.
शेणोलीमध्ये अलिकडील कालावधीत अनेक नवनवीन उपक्रमांना चालना दिली जात आहे. त्यामध्ये काल गावातील महिलांनी मुस्लिम महिलांसाठी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची नव्याने भर पडली. गावातील काही सूज्ञ ग्रामस्थांनी मुस्लिम महिलांसाठी सर्व जाती-धर्मातील महिलांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन केले. त्यानुसार गावचे सुपुत्र पलूसचे तहसीलदार मधुसुदन बर्गे व सांगलीचे मोटार वहान निरीक्षक चैतन्य कणसे यांनी ही पार्टी सर्व महिला तसेच महिला पोलीस अधिकार्‍यांसमवेत साजरी करण्याचा नाविण्यपूर्ण उपक्रम सुचवला. त्यानुसार काल गावच्या इतिहासात सामाजिक ऐक्य टिकवणारा उपक्रम यशस्वी झाला. ग्रामदैवत श्री मारुती मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, परिवहन अधिकारी सतीश शिवणकर, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोंजाळ, पोलीस उपनिरीक्षक राठोड, शेलार, सौ. विजया कणसे, पलूसचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, सांगलीचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, सरपंच सौ. आदित्या कणसे, उपसरपंच अमोल पाटील व ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या, बादशहा मुल्ला, इकबाल मुल्ला, झाकीरहुसेन मुल्ला तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.