Breaking News

बाभळगाव येथील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ

परभणी, दि. 02 - जिल्ह्यातील बहुतांश भागांत पावसाचे आगमन झाले असून   नुकत्याच झालेल्या पावसाने पाथरी तालुक्यातील बाभळगाव परिसरातील ओढे-नाल्यांत पाणी साठले. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या विविध जलसंधारणाच्या कामांची परिणामकारता आता दिसून येऊ लागली असून गोदावरी नदीतही पाणी जमा होऊ लागल्याने बाभळगावातील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे गावातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे झाली आहेत, काही प्रगतीपथावर आहेत तर नवी कामे सुरू होत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत पाथरी तालुक्यातील बाभळगाव परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातही पाणी साचत असून त्यामुळे येथील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. परिसरातील बांधात साठलेल्या पाण्यामुळे शिवारातील विहिरींच्या, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या तसेच बोअरच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. यामुळे गावातील पाणीटंचाई दूर होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. खोलीकरण केलेले बंधारे भरुन वाहु लागल्याने तसेच साचलेले आणि वाहणारे पाणी पाहुन परिसरातील  शेतकरी आनंदित झाले आहेत.