राज्यात सोमवारपासून पाऊस !
पूर्व विदर्भातून मॉन्सून महाराष्ट्रात दाखल
पुणे, दि. 18 - प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मॉन्सूनचे अखेर शनिवारी महाराष्ट्रात आगमन झाले असून, एरवी कोकणातून दाखल होणारा मॉन्सून यंदा पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गेले अनेक दिवस गोव्यापर्यंतच रेंगाळणार्या मॉन्सूनची आगेकूच शुक्रवार रात्रीपासून सुरू झाली.आज सकाळपर्यंत मॉन्सूनने आंध्र प्रदेशच्या किनारी भागातील उर्वरित प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालचा काही भाग, विदर्भाचा काही भाग, छत्तीसगड आणि तेलंगणापर्यंत मजल मारली. मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असल्याने आता मध्य महाराष्ट्र, संपूर्ण कोकण आणि गोवा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, तेलंगण, विदर्भाचा उर्वरित भाग आणि झारखंडमध्ये येत्या 48 तासांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होऊ शकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
केरळमध्ये काल (शुक्रवार) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वार्यांमुळे राज्यात किमान 50 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच, ‘ऑल इंडिया रेडिओ‘चा केरळमधील एक टॉवरही कोसळल्याने रेडिओ प्रक्षेपणामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.पश्चिम राजस्थान ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे, तर दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशालगत हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे वाहत होते. कर्नाटक आणि केरळच्या किनार्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. मॉन्सूनच्या वाटचालीस आवश्यक वातावरणीय स्थिती तयार झाल्याने सोमवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
