Breaking News

अभिनेत्री ममता कुलकर्णीचा ड्रग्ज तस्करीत सहभाग

मुबंई, दि. 18 -  ड्रग्ज रॅकेट प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे असून, नव्या पुराव्यांच्या आधारे ममता आरोपी आहे. सध्या ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी केनियामध्ये असल्याची माहिती शनिवारी ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुराव्यांच्या आधारावर ममता कुलकर्णी आता ड्रग रॅकेट प्रकरणात आरोपी असून, सीबीआयमार्फत ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस पाठवण्याची
विनंती इंटरपोलला करणार आहोत, असेही ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ड्रग तस्करांच्या बैठकीत ममता कुलकर्णी उपस्थित होती, ममताविरोधात 2 आरोपींची साक्ष, असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचा प्रमुख संचालक मनोज जैन याच्यासह चार ते पाचजणांनी गोस्वामीची केनियामध्ये भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये एव्हॉन कंपनीतील ‘इफ्रेडीन’ पावडरवर प्रक्रिया करून त्यापासून ‘मेथाम्फेटामाइन’ या अमली पदार्थाची निर्मिती करण्याची कंपनी मोम्बासा येथे सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती.
8 जानेवारी रोजी ड्रग माफिया अब्दुल्ला याच्यासोबत झालेल्या बैठकीत ममता उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत ड्रग्ज भारतातून कशाप्रकारे आणायचे यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय, तिच्या नावावर 11 लाखांचे शेअर्स असून तिचे वर्सोवा येथे 4 फ्लॅट्सही आहेत. ड्रग्ज तस्करी प्रकरणात ममता आरोपी असल्याचे साक्ष दोन साक्षीदारांनी कोर्टात दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस सध्या तिची सर्व मालमत्ता व बँक खात्यांची कसून तपासणी करत आहेत. या रॅकेटचा बॉलीवूडशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी यावेळी व्यक्त केली.