Breaking News

भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द केल्यास पदाचा त्याग करू !

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
माजी मंत्री एकनाथ खडसेंची पाठराखण

पुणे, दि. 18 -  भ्रष्टाचाराचे सातत्याने आरोप होत असतांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे सिध्द केल्यास आपण आपल्या पदाचा त्याग करू असे सांगत विरोधकांवर शनिवारी हल्लाबोल करत भाजपच्या नेत्यांवर होणार्‍या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
भाजपच्या दोन दिवसाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पाठराखण केली. एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन असून लवकरच ते यातून बाहेर पडतील असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर दाऊदकडून कुठलाही कॉल आलेला नाही हे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले आहे.गजानन पाटील लाच प्रकरणाशीही खडसेंचा संबंध नसल्याचे एसीबीच्या तपासातून समोर आले आहे. एमआयडीसी जमीन गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे खडसेंनी राजीनामा दिला असून, लवकरच ते यातून बाहेर येतील असे फडणवीस यांनी सांगितले.यावेळी फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचा भष्ट्राचार खणून काढा, त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले़ सरकार अनेक आघाड्यांवर काम करीत आहे़, सरकार काय करते आहे, ते समजून घ्या़ शेतकर्‍यांना विमा दिला, 1 कोटी शेतकर्‍यांना 4 हजार कोटींचा विमा वाटप केले, असे त्यांनी सांगितले़.
या कार्यक्रमाला एकनाथ खडसेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या खुर्च्यांमध्ये एकनाथ खडसे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. भ्रष्टाचार्‍यांनी आम्हाला शिष्टाचार शिकवू नये. प्रथम सरकारचे भूखंड परत करा मग आरोप करा, असे सांगत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.