Breaking News

डॉ. श्रीपाल सबनिसांकडून ‘सैराट’चे कौतुक

पुणे, दि. 02 - ज्येष्ठ समीक्षक, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरित झालेला वडार समाजातील एक मुलगा चित्रपटसृष्टीतील  प्रस्थापितांना मागे टाकत विक्रमी सैराट बनवतो आणि महाराष्ट्राचे झणझणीत वास्तव मांडण्याचे धाडस करतो, हे
महत्त्वाचे असल्यामुळे पुणेकरांनी नागराजचा  सत्कार करायला हवा, असे मत व्यक्त केले.
डॉ. सबनीस महत्त्वाकांक्षा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा आणि महेश थोरवे यांच्या अस्त- व्यस्त कवितांची पानं या काव्यसंग्रहाच्या  प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. यावेळी अभिनेते सुरेश विश्‍वकर्मा म्हणाले, सैराटनंतर ख-या आयुष्याला सुरुवात झाल्याचे वाटते. कलाकार खेड्यातून शहरात येतो,  त्यावेळी त्याचा संघर्ष पाचपट वाढतो. कारण शहरात त्याच्या आतल्या टॅलेंटपेक्षा बाह्यरूपाची चर्चा अधिक होते. नागराज हा वास्तववादी दिग्दर्शक आहे. फॅड्रीचे  गीत चित्रपटात नसल्याची अनेकांनी तक्रार केली होती. त्यामुळेच त्याने या चित्रपटात गाणी घेतली. मात्र, चार गाणी 50 मिनिटांत उरकली आणि वास्तव  जगासमोर मांडले. तात्याच्या भूमिकेत मी जे केले ते वास्तवात कधीच केले नसते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. सबनीस म्हणाले, दिग्दर्शक नागराज  मंजुळेंनी फॅड्रीनंतर सैराट हा तद्दन व्यवसायिक वाटावा असा चित्रपट आपल्या समोर आणला. मात्र, त्यातून त्यांनी वास्तव मांडण्याचे धाडस केले आहे. प्रस्थापित  चित्रपटांची आणि प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढत वास्तववादी चित्रपट मांडणे हे मोठ धाडस आहे.त्याचे कौतुक पुणेकरांनी करायला हवे, कलेचा विकास  आणि विस्ताराबरोबर त्याने सामाजिक भान जपले आहे. महाराष्ट्रात आज शेतक-यांसाठी विविध योजना मांडण्यात येत आहेत. मात्र, राज्यातील या दुष्काळी  परिस्थितीला पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकारच जबाबदार आहे.
सर्वच मंत्र्यांनी महाराष्ट्राशी बेइमानी केली आहे. कोट्यवधींच्या योजना जाहीर होतात. मात्र, शेतक-यांकडे पैसे पोहोचत नाहीत. हे सरकार नक्की काय करत आहे,  हा प्रश्‍न यामुळे निर्माण होतो. सरकारच्या या करंटेपणाचा मी निषेध करतो. डॉ. भोंगळे म्हणाले, राज्यातील दुष्काळाचा प्रश्‍न मोठा आहे, त्याला इतिहासही आहे.  मराठवाड्यातील नद्या या दुष्काळी भागातच उगम पावतात. यामुळे त्यांना पाणी नसते. यामुळे मराठवाड्याला 48 टीएमसी पाणी देण्याची मागणी आहे. मात्र, त्याने  प्रश्‍न सुटणार नाही, यासाठी पाणलोट कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे.