कोयना धरणातील पाणी पातळी पुर्णत: खालावली
लेक टॅपिंगमधील विहीर उघडी पडली; सिंचनासाठी सोडलेले पाणी बंद
पाटण, दि. 6 (प्रतिनिधी) : कोयना जलाशयात सध्या 12.97 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाण्याच्या पातळीने तळ गाठल्याने टप्पा क्रमांक चारचे अभिजल भुयार व टप्पा एक व दोनच्या अभिजल भुयाराकडे जाणारा कालवाही उघडा पडला. त्याचबरोबर पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले.अभिजल भुयार म्हणजे वीजनिर्मितीसाठी काढलेल्या बोगद्यानजीक पाणीसाठा होण्यासाठी काढलेली विहीर. कोयना प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठ्याचे 1 जूनपासून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्या कोयना धरणात 1 जून रोजी 14.48 टीएमसी पाणीसाठा होता. सध्या धरणात 12 टीएमसी पाणीसाठा असून, 7.85 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. पाणीपातळी खालावल्याने आशिया खंडातील पहिले लेकटॅपिंग केलेल्या टप्पा चारच्या अलोरे येथील 1 हजार मेगावॉटनिर्मिती प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारे अभिजल भुयार उघडे पडले आहे. हे अभिजल भुयार उघडे पडले असले तरी त्याचा वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण दुसरे लेकटॅपिंग केलेल्या टप्पा चारमधून (ब) पाणीपुरवठा सुरू आहे. टप्पा चारच्या अभिजल भुयाराप्रमाणे नवजा टॉवर येथून टप्पा एक व दोनसाठी पाणीपुरवठा करणार्या अभिजल भुयारापर्यंत जलाशयातून काढलेला कालवाही दिसू लागला आहे. टप्पा चारचे अभिजल भुयार व टप्पा एक व दोनसाठी काढलेला कालवा दिसू लागला असला, तरी त्याचा वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु धरणातील सध्याचा पाणीसाठा विचारात घेऊन कमी क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. 31 मेपर्यंत वीजनिर्मितीसाठी 51.44 टीएमसी व सिंचनासाठी प्रकल्पाच्या इतिहासात प्रथम 34.60 टीएमसी पाणी वापर झाला आहे. 1 जूनपासून वीजनिर्मितीसाठी 0.46 टीएमसी व सिंचनासाठी 0.41 टीएमसी असा एकूण 0.87 टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती केल्यानंतर सिंचनासाठी कोयना नदी पात्रात पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणी बंद केले आहे.
