Breaking News

प्रांताधिकार्‍यांसह ग्रामस्थांच्या श्रमदानातून 31 उभारले दगडी बंधारे

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींचा ताफा धावडशीकडे निघाला. कोणतीही बैठक नसल्याने हातातील फाईलींच्या जागी  फावडे अन् कुदळ होती. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार राजेश चव्हाण, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे आदींसह धावडशी येथील पेढा-भांगा शिवारात  ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा

लावून श्रमदान केले महिला, युवा तसेच ग्रामस्थांच्या साथीने श्रमदानातून तब्बल चार दिवसात 31 दगडी बंधारे उभारले. 
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अधिकारी कर्मचार्‍यांनी धावडशीकडे धाव घेतली नेहमी हातात दिसणार्‍या फायलींच्या जागी कुदळ फावडे होती. 3 जून रोजीही अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून 14 दगडी बांधरे बांधण्यात आले.
खेबुडकर म्हणाले, महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती तसेच धावडशी ग्रामस्थांच्या श्रमदानातून 31 दगडी बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधार्‍यांमुळे 400 एकर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. धावडशी येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवाराच्या कामांना 2 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला असून तसेच अधिकारी, कर्मचार्‍यांनी 1 लाख 50 हजारांचा निधी  धावडशी येथील जलयुक्त शिवारच्या कामांना उपलब्ध करुन दिला आहे. येथील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. रोज 200 ते 250 लोकांनी श्रमदान केले. यातून त्यांना सामाजिक कामाचा अनुभवही आला. श्रमदानानंतर लोकसहभागातून वृक्षरोपणासाठी 200 खड्डे खोदण्यात आले होते. या खड्ड्यांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले. यावेळी सरपंच लक्ष्मी शिंदे, उपसरपंच अरुण पवार, मंडल कृषी अधिकारी सुनिल जाधव, विस्तार अधिकारी वसंत धनावडे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.