Breaking News

पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष !

ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम आता थेट आपल्या घरात येवून पोचलेत. ॠतूचक्रात झालेले तीव्र बदल आपण सारे भोगतो आहोत. पर्यावरणाची होणार र्‍हास आता  आपल्या जीवावर बेतू पाहत आहे, तरी ही आपण त्याकडे लक्ष्य देत नाही. कालच पर्यावरण दिन सगळीकडे उत्साहात साजरा होत असतांना, आपण फक्त त्या  एका दिवसाचे महत्व जपत वर्षभर पर्यावरणाकडे काही लक्ष देत नाही. सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेम्बलीने 1972 च्या स्टॉकहोम येथील  पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘5 जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी  व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. ‘जागतिक पर्यावरण दिन’ दिन साजरा करत असतांना यात सर्व लोकांच्या  सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील 100  पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम  यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वत:ला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. बदलत्या काळात  पर्यावरण वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे.यास्तव जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन  डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास कसा हातभार लावता येईल ह्याबाबत विचार करून वागले म्हणजे तसे रोजच्या जगण्यात बदल  केले तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि  संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.तसे पाहिले तर मानव हा पर्यावरणाचाच एक अत्यंत बुध्दीमान सजीव भाग म्हणा वा सजीव घटक आहे. मात्र  पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असो वा निर्जीव अशा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय  पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे. भोपाळ येथे 3 डिसेबंर 1984 रोजी विषारी वायुगळती आणि  त्यापासून झालेली अपरिमित हानी आजतागायत विसरता येत नाही. त्यामुळे घातक रासायनिक (विषारी वा तत्सम) वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक  उपाययोजना करणे किती अत्यावश्यक  आहे हे लक्षात येते, मात्र अद्यापही आपण त्यावर उपाययोजना करण्यात यशस्वी ठरलो नाही. निसर्गातील चक्र हे ठरलेले  आहे, आपण मात्र त्याला नेहमीच छेद देत आलो आहे. आपले जीवन सुखासी, विलासी, चैनीत जगण्यासाठी आपण निसर्गाला दावणीला बांधायला लागलो आहे,  मात्र आपण आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी जरी असा अठ्ठाहास करत असलो तरी, निसर्ग ही मग आपले रौद्र रूप धारण करतोच. मग त्यातून जपान मध्ये  2011 मध्ये झालेले त्सुनामीचे तांडव असेल, विविध सागरी वादळे, पुणे जिल्हयातील माळीण सारखी दुर्घटना असेल, नेपाळ मधील भूकंप, उत्तराखंड मधील  महापूर, ढगफुटी, दुष्काळ, रोगराई हे सगळे निसर्गाचा प्रकोप आहे, आपल्या सुखासीन जगण्याला निसर्गाने दिलेले हे उत्तर आहे. त्यामुळे आपण आपली प्रगती  साधत असतांना पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही याकडे देखील लक्ष द्यायला हवे. शाश्‍वत विकासाची संकल्पना आपण प्रत्यक्षात राबविली पाहिजे. तरच निसर्ग  आणि मानवी जीवन याचा सुरेख मेळ घालता येईल.