तर उच्च पदस्थांवरच जातीयवादाचा गुन्हा
किशोर पाटीलवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांना साकडे
मुंबई, मंत्रालय/प्रतिनिधी, दि. 07 - महापुरूषांची तैलचित्रे अडगळीत फेकून राष्ट्रीय अस्मितेचा घोर अवमान करणारे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र शासन-प्रशासनातील संबंधित उच्चस्तरीय पदस्थांवरच जातीयवादाचा (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करावा लागेल. असा इशारा राष्ट्रीय क्रांतीसूर्य सत्यशोधक ओबीसी सेवा संघ यांनी मुख्यमंत्र्यांसह मुख्यसचिव बांधकाम सचिवांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. एकुणच या अवमान प्रकरणाला वेगळे वळण लागले असून महापुरूषांना अडगळीत ठेवू पाहणारे किशोर पाटील हेच अडगळीत पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या संदर्भात सविस्तर वृत्तांत असा की, मुंबई रस्ते विकास संकल्पचित्र विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी आपल्या कार्यालयात महापुरूषांचे अस्तित्व नाकारून एक प्रकारे राजद्रोहच केल्याची वृत्तमालिका दै. लोकमंथनने प्रसिध्द केली होती. आपल्या कार्यालयातील महापुरूषांचे तैलचित्र काढून अडगळीत टाकल्याचा पुरावाही लोकमंथनने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर बहुजन समाजामध्ये संतापाची तिव्र लाट उसळली होती. हे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महापुरूषांचा घोर अवमान करणार्या कार्यकारी अभियंत्याला जाब प्रशासनाने स्वतःहून विचारणे अपेक्षित होते. प्रशासनाने जाब तर विचारलाच नाही, शिवाय लोकमंथनच्या वृत्तानंतर संतप्त झालेल्या बहहुजन संघटनांनी मुख्य सचिवांना निवेदन पाठवून कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर काडीने मलम लावण्याचा प्रयत्न म्हणून साबां सचिव एसबी तामसेकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि या नराधम प्रवृत्तीविरूध्द कुठलीच कारवाई होत नाही यावरून प्रशासनातील उच्चपदस्थच किशोर पाटीलच्या या अधम कृत्याला पाठीशी घालीत असल्याची शंका बहुजन समाजात बोलून दाखविली जात आहे. या शंकेचे परिवर्तन बहुजनांचा असंतोष भडकण्यात होऊ नये म्हणून राष्ट्रीय क्रांतीसूर्य ओबीसी सेवा संघाने प्रशासनाला आणखी एक संधी दिली आहे. या संदर्भात राष्ट्रीय क्रांतीसूर्य ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगीतले की ओबीसी सेवा संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यसचिव स्वाधीन क्षत्रीय बांधकाम सचिव (रस्ते) सी.पी.जोशी, बांधकाम सचिव एस.बी.तामसेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. किशोर पाटील यांच्यावर कडक कारवाई करून बहुजनांच्या अस्मितेला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यानंतरही कारवाई झाली नाही तर किशोर पाटील ययांच्या या पापाला उच्च पदस्थांचाच पाठिंबा आहे हे गृहीत धरून या सगळ्यांवर जातीयवाद विरोधी कायद्याचा आधार घेऊन गुन्हा दाखल करू आणि बहुजनांच्या भावनांचा उद्रेक झालाच तर त्याचीही जबाबदारी उच्चपदस्थांवरच राहील असे अशोक सोनवणे यांनी स्पष्ट केले.
किशोर पाटीलच्या शिष्या प्रज्ञा वाळके
यांची शहर इलाखात मनमानी वावर
साबांच्या भ्रष्ट कुरणात चरून मदमस्त झालेले कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी महापुरूषांचा अवमान करण्यापर्यंत मजल गाठली. त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबई शहर इलाखा विभागात काम करणार्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनीही मनमानी सुरू केली आहे. वारंवार ज्या 98 कोटीच्या देयके रद्द प्रस्तावाची चर्चा घडवून आणली जाते त्यातीलच तब्बल दीड कोटीची बीले कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांनी अदा करून साबां प्रशासनालाच आव्हान दिले आहे. किशोर पाटील यांच्याच सांगण्यावरून प्रज्ञा वाळके यांनी हा व्यवहार देवाण-घेवाणची प्रक्रिया पुर्ण करून केला अशी साबांत वाच्यता आहे.
