Breaking News

म्हाडा घरकुलांची कामे पुर्ण करा ः खा.जाधव

बुलडाणा, दि. 01 - नगर पालिका क्षेत्रातील म्हाडा घरकुलांची कामे त्वरीत पुर्ण करा अशा सुचना खा.प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला केल्या. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात नुकतीच केंद्रीय योजनांची आढावा बैठक खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी व्यासपीठावर सिंदखेड राजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  नेमाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनूप शेंगूलवार आदी उपस्थित होते.
म्हाडा व मिनी म्हाडा घरकूलांची नगर पालिका क्षेत्रातील कामे त्वरित पूर्ण करण्याचे सांगत खासदार जाधव म्हणाले, केंद्र सरकारने प्रत्येक बेघराला निवारा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेला मृत स्वरूपात आणण्यासाठी  प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकूलांची निर्मिती करावी लागणार आहे. घरकूलांच्या प्रतिक्षा याद्या संपवाव्या लागणार आहे.
पं. दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेद्वारे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना जागा खरेदी करण्यासाठी शासन 50 हजार रूपयांची मदत करीत आहे. त्यामुळे जागा नसलेल्या बेघरांना जागा मिळून घरकूल बांधण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.  याप्रसंगी आमदार महोदयांनी विविध प्रश्‍न मांडले.
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेमाने यांनी विविध योजनांची माहिती दिली व सद्यपरिस्थिती सांगितली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.