Breaking News

पीककर्जात राष्ट्रीयकृत बँकांचा खोडाः भाऊसाहेब फुंडकर

चिखली, दि. 01 - बुलडाणा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पीक कर्ज पुर्नगठणाच्या कामात राष्ट्रीयीकृत बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. पाणीटंचाईग्रस्त गावांना विद्युत भारनियमन व दूरवर असलेले पाणी स्त्रोत यामुळे टँकरद्वारे पर्याप्त पाणीपुरवठा होत नाही, या प्रश्‍नांवर तातडीने प्रभावी तोडगा काढण्याचे आदेश सर्वसंबधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते आ. पांडूरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी स्थानिक पत्र

कार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आ. पांडूरंग फुंडकर यांनी आज बुलडाणा तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. त्यात त्यांनी धाड परिसरातील इरला, चांडोळ, जांब, सातगाव, म्हसला यासह अनेक गावांना भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बुलडाणा मुख्यालयी जिल्हा व तालुकास्तरीय शासकीय अधिकार्‍यांची सुमारे तीन तास आढावा बैठक घेऊन दुष्काळावरील उपाययोजनांवर प्रदीर्घ चर्चा करीत आवश्यक त्या सत्वर उपाययोजनांचे आदेश दिलेत. भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले की, बँकांनी शेतकर्‍यांच्या पीक कर्जाचे त्वरित पुर्नगठन करुन त्यांनी नवीन कर्ज देण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत. त्यानुसार ज्या बँका हे आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांच्या किमान गरजेएवढे पर्याप्त पाणी टँकरने पुरविण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. यावर जे अधिकारी व कर्मचारी कुचराई करतील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. बुलडाणा तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांना दुष्काळग्रस्तांसाठी असलेला मदत निधी प्राप्त झाला आहे. अवघ्या एक दोन टक्क्याचे निधी वितरणाचे काम बाकी आहे ते पूर्ण करण्यात येईल. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. आर्थिक वर्षातील कृषि विभाग, जलसंधारण विभाग, सिंचन विभाग, वन विभाग व भूजल सर्वेक्षण विभाग यांच्याकडील सलगचर, समतलचर, ढाळीचे बांध, नालाबांध, सिमेंट बांध, जल आणि माती उपचाराची कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी पंचवीस कोटीचा खर्च झाला असून त्याचे दृश्य परिणाम पावसाळ्यानंतर दिसतील. कोल्हापूर टाईप बंधार्‍यासाठी आवश्यकतेनुसार 2 ते 5 मीटरच्या सिमेंट भिंती असाव्यात असे प्रस्तावित करण्यात आले आहे. पिक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना 184 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येत आहे. ही रक्कम त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, श्‍वेताताई महाले, योगेंद्र गोडे, जगदेवराव बाहेकर, दत्ता पाटील, मोहन पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाच्या निर्देशावरुन आ. पांडूरंग फुंडकर यांनी बुलडाणा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केल्यानंतर पीक कर्ज पुर्नगठण, पाणीटंचाई उपाययोजना, जलयुक्त शिवार योजना, शेतकर्‍यांच्या अडीअडचणी व समस्या यावर जिल्हा व तालुकास्तरीय अधिकार्‍यांची तीन तास आढावा बैठक घेऊन त्यांना योग्य ते निर्देश दिले. दुष्काह निवारणाच्या कामात कुचराई करणार्‍या अधिकार्‍यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यातील दुष्काळ निवारण उपाययोजना व खातेनिहाय कामांची प्रगती याचा सविस्तर अहवाल ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत. शिवाय निष्क्रीय व अकार्यक्षम अधिकार्‍यांवर कारवाई ही शासनाकडे प्रस्तावित करणार आहेत.