मालवण तालुक्यात पावसाचा कहर!
मालवण तालुक्यातील देवली-वाघवणे येथे डोंगर खचला असून; येथील वसंत चव्हाण व बाळाजी चव्हाण यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय लगतच्या सहा घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. महसूल प्रशासनाने याची तात्काळ द
खल घेत सहाही घरे रिकामी करून या कुटुंबांतील 25 जणांना स्थलांतरित केले आहे.
डोंगर धोकादायक बनल्याने प्रशासनाने डोंगरमाथ्यावर वसलेल्या 40 कुटुंबांना यापूर्वीच स्थलांतराच्या नोटिसा दिल्या होत्या. आता नव्याने काही कुटुंबांना स्थलांतराचे आवाहन करण्यात आले आहे. माळरानावरील शेत मांगरात आठ ते दहा कुटुंबीयांनी स्थलांतर करून आसरा घेतला आहे.
ज्या कुटुंबाना राहण्याची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांची प्राथमिक शाळा अथवा ग्रामपंचायत कार्यालयात व्यवस्था केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मालवण तालुक्यात बुधवारी दिवसभरात 136 मिमी पाऊस झाला. परिणामी मालवण बाजारपेठेतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही दुकाने, घरातही पाणी शिरले आहे.