Breaking News

निरोगी जीवन जगण्यासाठी आहारावर नियंत्रण आवश्यक ः कर्डिले

। ‘नोबल’ व राजे मित्रमंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अहमदनगर, दि. 30 - बदलत्या आहार पद्धतीमुळे आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, या आहाराचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. आहार घेताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जंकफुडसारख्या गोष्टींकडे प्रत्येकजण आकर्षित होत आहे. तरुण पिढीतर मागचा पुढचा विचार न करता आहाराबद्दल उदासीन आहे. त्यामुळे शरीरावर परिणाम होऊन आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. दररोज नवनवीन आजार उद्भवल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने हे टाळण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. वेळोवेळी शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. आजच्या महागाईच्या युगात वैद्यकीय सेवाही महागडी झाली असून, मोफत शिबिरे आजची गरज बनत चालली आहे. या शिबिरांचा सर्वसामान्यांनी लाभ घेऊन निरोगी जीवन जगावे, असे आवाहन बाबासाहेब कर्डिले यांनी केले.
एशियन नोबल हॉस्पिटल व राजे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुर्‍हाणनगर येथे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी श्री. कर्डिले बोलत होते. या शिबिरात रुग्णांची हॉस्पिटलचे संचालक डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. संदीप गाडे, डॉ. भगवान कलाणी, डॉ. अन्सार खान, अक्षय कर्डिले, देवीदास कर्डिले, डॉ. महेश घुगे, डॉ. प्रीती थोरात आदींनी तपासणी केली. यावेळी विजय निकम, प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, बंगाळे, जालिंदर बोरुडे, विनय पिंपरकर आदी उपस्थित होते. डॉ. कांडेकर म्हणाले की, शिबिरे अनेक ठिकाणी आयोजित केली जातात. गेल्या दहा वर्षांपासून नोबलच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांचा मोठ्या संख्येने रुग्ण लाभ घेतात. शिबिरात तपासणीबरोबर कमी खर्चात शस्त्रक्रियाही केल्या जातात. राजीव गांधी जीवनदायी योजनेची अनेकांना माहिती नसून, या योजनेचा प्रसार व प्रचार होणे गरजेेचे आहे, असे ते म्हणाले.विजय निकम म्हणाले की, या शिबिरात हृदयविकार, मेंदूविकार, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा विकार, किडनी विकार आदींची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिराचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला, असे ते म्हणाले.