Breaking News

शिवसेनेने केली खडसेंच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई, दि. 02 - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याभोवतीच्या अडचणीत आता आणखी वाढ होत असून आता मित्रपक्ष आणि सत्तेतील सहकारी शिवसेनेनेही  एकनाथ खडसेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

खडसेंवर असलेल्या आरोपांची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी आपले पद सोडावे आणि निर्दोषत्व सिद्ध करुन सन्मानाने मंत्रिमंडळात यावे, ही  महाराष्ट्राची परंपरा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणासह इतर गंभीर आरोप खडसे  यांच्याविरोधात झाले आहेत. अशावेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  शिवसेनेच्या मागणीनंतर एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मला काहीही बोलायचे नाही, याबाबत पक्षाचे अध्यक्ष बोलतील,  असे खडसे म्हणाले.
दरम्यान, खडसेंनी राजीनाम्यासाठी दबाव असल्याने मुंबईतून काढता पाय घेतला आहे. मुक्ताई अंतर्धान सोहळ्याच्या निमित्ताने खडसे गेल्या तीन दिवसांपासून  मुक्ताईनगरात आहेत. विशेष म्हणजे या काळात त्यांनी सरकारी गाडीचा वापर करणेही टाळले आहे.