Breaking News

मल्ल्यांना ईडीची ’जाहीर नोटीस’

मुंबई, दि. 30 -  फरारी घोषित केलेल्या विजय मल्ल्या यांना 29 जुलैला विशेष न्यायालयासमोर हजर होण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने ईडी बुधवारी जाहीर  नोटीस बजावली आहे. मार्चपासून मल्ल्या लंडनमध्ये असून, तपास यंत्रणांना चकवा देत आहेत.
बँकांचे कर्ज आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणात मल्ल्यांना विशेष न्यायालयाच्या आदेशाने मुंबई आणि बंगळुरुमधील वृत्तपत्रांत जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली  आहे. किंगफिशरच्या पत्त्यावरही ही नोटीस पाठवली असून, मल्ल्यांनी मनी लॉण्डरिंग कायद्यातील कलम 4 चा भंग केल्याचे यात म्हटले आहे. मल्ल्यांना यापूर्वी दोन  वेळा नोटीस बजावण्यात आली असून, अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आले आहे. याला मल्ल्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
किंगफिशरला दिलेल्या 9000 कोटींच्या कर्जाप्रकरणी चौकशी करण्यासाठी मल्ल्या हवे असल्याचे ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले होते. 29 जुलैला मल्ल्या  अनुपस्थित राहिल्यास ईडीकडून त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी म्हटले आहे. ईडीने यापूर्वी मल्ल्यांची 1411 कोटींची मालमत्ता  जप्त केली आहे. मल्ल्यांना रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी ईडीकडून इंटरपोललाही पुरावे सादर करण्यात आले आहेत.