Breaking News

महात्मा गांधी खरे की, मोदी : अण्णा हजारे

राळेगणसिद्धी, दि. 30 -  ‘खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही,‘ हे महात्मा गांधी यांचे म्हणणे खरे, की शहरीकरण संकट नाही तर एक  संधी आहे,‘ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे, असा प्रश्‍न ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र  पाठविले असून, त्यात स्मार्ट सिटी‘ योजनेला कडाडून विरोध केला आहे. 
हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की शहरांचा विकास करताना निसर्गाचे शोषण होत आहे. पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. एकीकडे महात्मा गांधी खेड्याकडे चला‘,  असे म्हणत होते आणि आता तुम्ही शहरीकरणाचा नारा लावला आहे. मग आपण म्हणता ते खरे, की गांधीजी म्हणत ते, असा सवाल त्यांनी केला आहे.  शहरीकरणामुळे निसर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण आणि परिणामी रोगराई वाढली आहे. शहरांची लोकसंख्या व त्या प्रमाणात  गरजा वाढत असल्याने समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
गाव बदलणार नाही तोपर्यंत देश बदलणार नाही, असे नमूद करत हजारे यांनी आपल्याच राळेगणसिद्धीचे उदाहरण पत्रात दिले आहे. मी सत्य बोलतो म्हणून राग  आल्याने माझ्या पत्राचे उत्तर आपण देत नाही. आताही आपण उत्तर देणार नाही, तरीही मी पत्र पाठवत आहे, असे म्हणत, आपण बोलता तसे वागत नाही,‘ असा  आरोपही हजारे यांनी मोदी यांच्यावर केला आहे.