Breaking News

अमेरिकेचा चीनला ‘कृत्रिम बेटा’ बाबत इशारा

सिंगापूर, दि. 06 -  चीनला दक्षिण चिनी समुद्रात कृत्रिम बेटांच्या निर्मिती विरोधात अमेरिकेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. हे कार्य जर चीनने थांबविले नाही तर अमेरिका तसेच इतर देश त्याच्याविरोधात कारवाई करू शकतात, असे अमेरिकेने म्हटले आहे. सिंगापूरच्या सुरक्षा शिखर परिषदेत अमेरिकन संरक्षणमंत्री एश्टन कार्टर यांनी हा इशारा दिला.
चीन वादग्रस्त समुद्रात कृत्रिम बेटांवर निर्मिती कार्य सुरू करण्याबरोबरच आपल्या लष्करी कारवाईचा विस्तार करू शकतो. अशा स्थितीत आम्हाला चीनविरोधात कारवाई करावी लागू शकते. या क्षेत्रात चीन एकटा पडू शकतो. चीनने इतर देशांना त्याच्याविरोधात कारवाई करणे भाग पडेल, अशी कोणतीही कृती करू नये, अशी विनंती कार्टर यांनी केली. त्यांनी दक्षिण चीन समुद्रात चीनच्या भडकावू भूमिकेवर टीका करत यामुळे क्षेत्रात तणाव वाढेल, ज्यामुळे त्याला कोणत्याही स्थितीत लाभ होणार नाही असे म्हटले. अमेरिकेबरोबरच अन्य आशियाई देशांनी देखील चीनवर वादग्रस्त समुद्री क्षेत्रातील हालचाली नियंत्रित करण्यासाठी दबाव वाढविला आहे. चीनला आशियाच्या सुरक्षा व्यवस्थेत सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्टर यांनी आपल्या भाषणात चीनला क्षेत्रीय सुरक्षा सहकार्यात सामील होण्याचे आवाहन केले.