Breaking News

शहीद महाडिकांच्या पत्नीचे पतीच्या पावलावर पाऊल!

सातारा, दि. 06 -  शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरमरणानंतर निर्धार केल्याप्रमाणे शहीद संतोष महाडिक यांची वीरपत्नीही भारतीय लष्करात रुजू झाल्या आहेत.

’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये स्वाती महाडिक या दाखल झाल्या आहेत. आर्मीचा ड्रेस स्वाती यांना केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावे लागते, त्या सर्व खडतर परिश्रमातूनचा मिळाला आहे. त्यांना केवळ वयाच्या अटीतून सूट मिळाली. अवघड अशी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात डडइची परीक्षा स्वाती या पास झाल्या. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या आहेत. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे त्यांचे प्रशिक्षण होईल.
देशाच्या सीमेचे रक्षण करत असताना जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आले. दहशतवाद्यांना टिपून मारणार्‍या संतोष महाडिक हे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. सातार्‍याचा हा जवान 17 नोव्हेंबर 2015रोजी शहीद झाला. मात्र त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुले भारतीय लष्करातच जातील, असा निर्धार केला होता. स्वाती यांनी केलेला निर्धार अवघ्या सहा-सात महिन्याच्या आतच सत्यात उतरवला आहे. आता एक अधिकारी म्हणून स्वाती या भारतीय लष्करात रुजू होतील.