Breaking News

हजरत हाजी मद्दुआशाह कादरी दर्गाचा संदल-उरुस उत्साहात साजरा

अहमदनगर, दि. 06 - सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या जुना बजार येथील हजरत हाजी मद्दुआशाह कादरी (रहे.) यांच्या दर्गाचा संदल-उरुस मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. संदल- उरुस निमित्त दर्गापासून पारंपारिक वाद्यांसह मिरवणुक काढण्यात आली. यावेळी शहरासह जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्गाच्या संदल-उरुस निमित्त बुधवारी संध्याकाळी निघालेल्या मिरवणुकित घोड्यांच्या रथामध्ये फुलांची चादर सजवण्यात आली होती. ढोलकीच्या तालावर नृत्य करणारे घोडे मिरवणुकीचे खास आकर्षण होते. मिरवणुकीत घोड्यांनी नृत्याद्वारे दोन पायावर उभे राहून दिलेल्या सलामीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डोलीबाजा व पारंपारिक वाद्याने मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी युवकांमध्ये उत्साह संचारला होता. जुना बाजार, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक येथून शोभयात्रेचे मार्गक्रमण करत जुना बाजार दर्गाह येथे शोभयात्रेची सांगता झाली. दर्गाच्या मजारवर संदल लावून उपस्थित भाविकांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली. यावेळी सय्यद मुस्तफामियॉ कादरी, मुजावर नुरमोहंमद अहमदशाह कादरी, फतेहमोहंमद नुरमोहंमद आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  संदल-उरुस उत्सवा निमित्त दर्गाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दर्गाह भोवती केलेल्या विद्युत रोषणाईने परिसर उजळला आहे. कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे संचलन मुजावर नुर महंमद शेख यांनी केले. संदल-उरुस उत्सव यशस्वी होण्यासाठी मदवाशाह फ्रेंड सर्कल ग्रुप व एफ.जे. ग्रुपचे युवक परिश्रम घेत आहे. या उत्सवा निमित्त गुरुवारी दुपारी आयोजित भंडार्‍याचा लाभ सर्व धर्मिय भाविकांनी घेतला. रात्री कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.