Breaking News

ऊसाचे भाव वाढविल्याने जनावरे जगविणे अवघड

। तीव्र चारा टंचाईमुळे ऊस दरात  वाढ । ढोरजळगाव परिसरातील परिस्थिती

 ढोरजळगाव, दि. 03 - भीषण चारा टंचाई निर्मा
ण झालेल्या शेवगाव तालुक्यात सध्या उसाचा चारा म्हणून वापर होताना प्रती टनाला भाव 4200 ते 4500 रुपये झाल्याने शेतकर्‍यांना आता जनावरे जगविणेच अवघड होऊन बसले आहे.
जायकवाडी धरणपट्ट्यात अत्यंत तुरळक ठिकाणी कसाबसा उभा असलेला ऊस आज चांगलाच भाव खाऊन गेला आहे. जागेवरच या ऊसाला तीन ते साडेतीन हजार रुपये टन याप्रमाणे भाव मिळत आहे. सध्या शेतकरी भिषण चाराटंचाईला सामोरे जात असताना इतर चारा मिळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. काही शेतकर्‍यांनी ज्वारीचा राखून ठेवलेला कडबा आता जनावरांनी फस्त केला आहे. हिरवा जारा सोडाच, मात्र वाळलेल्या चार्‍याचेही दुर्भिक्ष तीव्रतेचे जाणवत आहे. चार्‍याअभावी अनेक शेतकर्‍यांनी गुरांचे गोठे रिकामे केले आहे. दुधाचे कित्येक दिवसांपासून लोळण घेणारे दर, तर दुसरीकडे पेंड, वालीस आणि इतर पशुखाद्याचे मजल-दरमजल करीत गगनाला भिडत जाणारे भाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने परिसरातील पशुधनातील संख्येत मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे दुध उत्पादनावर याचा परिणाम दृष्य स्वरुपात जाणवू लागला आहे.
याला पर्याय म्हणून छावण्याचा पर्याय पुढे आला. मात्र छावणीपर्यंत जाण्यासाठीच्या मार्गात शासनाने जाचक अटींच्या अडथळ्यांची जणू शर्यतच ठेवली. ही शर्यत पार पाडणे अत्यंत जीकीरीचे असल्याने छावणी उभारणीसाठी लवकर कोणीही धजावले नाही. यानंतर मात्र भातकुडगाव, वाघोलीसारख्या ठिकाणी कशाबशा छावण्या उभारल्या गेल्या. त्यातही आसपासच्या खेड्यापाड्यातील जनावरे तशीच दावणीमध्ये उपाशीपोटी उभी राहिली.
छावण्या उभारल्या जातील या अपेक्षेने शेतकर्‍यांनी प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन जनावरे जगविली. मात्र चार्‍याचे भाव दिवसें-दिवस आवाक्याबाहेरच जात राहिले. त्यातही पाणीटंचाईचे संकट आणखीनच गडद होत गेले. ते आजही टिकून आहे. अशा एका ना अनेक संकटांचा सामना करीत जगविली जनावरे ऐन पावसाळ्याच्या तोंडी अक्षरश: सोडून देण्याची वेळ आली आहे.
अगोदरच बेरोजगारी छातीवर बसलेली असताना कुटूंबाचा गाडा ओढणे च मुश्किल झालेल्या शेतकर्‍यांना आता जनावरांसाठी जारा उपलब्ध करणे हाच एक प्रश्‍न पडला आहे. मिळेल तेथून आणि मिळेल तो शिवाय मिळेल त्या भागात चारा उपलब्ध करणे शेतकर्‍यांना क्रमप्राप्त झाले आहे. अनेकांनी उसनवारी हातउसने कर्जाऊ आणि मिळेल त्या मार्गाने पैसे उपलब्ध करुन जनावरांवर खर्च केला आहे. शेती आणि बेरोजगारी यांना उत्तम पर्याय म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र दुधाचे दर कोसळल्यापासून या व्यवसायाकडे दुध उत्पादकांचे डोळेच पांढरे झाले आहे. भविष्यात या व्यवसायाला चांगले दिवस येथील या भाबडया अपेक्षेने आजमितीला शेतकरी उसाचसाठी टनाला साडेचार हजार रुपये मोजत आहे. साखर कारखान्यांना अडीच हजार रुपये हमीभाव मागणार्‍या शेतकर्‍यांपैकी फक्त धरणाच्या कडेला असणार्‍या शेतकर्‍यांना मात्र साडेतीन हजार रुपयांप्रमाणे भााव मिळत आहे. इतर ठिकाणच्या शेतकरी मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.