शहरात एकाच वेळी 200 विकास कामे सुरु होणार
। मुलभूत, महापौर निधी कामातील अडथळे दूर । निविदा मंजूरीसाठी स्थायीची शनिवारी सभा
अहमदनगर, दि. 03 - महापालिकेच्यावतीने शहरात एकाचवेळी 200 विविध प्रकारची विकास कामे सुरु केली जाणार आहेत. यामध्ये मुलभुत सोयीसुविधा निधीतील 140, महापौर शहर विकास निधीतील 33, बीआरजीएफ मधील 20 तसेच दलित वस्ती सुधार योजनेतील काही कामाचा यामध्ये समावेश आहे.ही कामे प्रशासकीय अडचणीमुळे अनेक दिवसांपासून रखडली होती. सर्वच कामातील अडथळे आता दूर झाले आहेत. मुलभूत सुविधा निधीतील 43 कामेही 25 लाखांच्या पुढील रकमेची असल्याने या कामाच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहे. सभापती भोसले यांनी तातडीने यासाठी शनिवार दि. 4रोजी स्थायी समितीची सभा बोलविली आहे.
महापालिका हद्दीतील जकात बंद झाल्यानंतर तीन वर्षापुर्वी राज्य शासनाने महापालिकेला शहरात मुलभुत सोईसुविधांचे कामे करण्यासाठी 20 कोटी रुपयाचा निधी दिला होता. त्याषत मनपाने 20 कोटीचा हिस्सा टाकून 40 कोटीची कामे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गेल्या 3 वर्षापासून सदर निधी तसाच पडून होता. निधी मिळाला तेव्हा युतीची सत्ता होती. त्यानंतर महापालिका निवडणूक होऊन सत्ता बदल झाला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये निधीतील कामावरुन बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सदर कामांना स्थगिती दिली. या विरोधात सत्ताधारी उच्च न्यायालयात गेले. नंतर मुख्यमंत्र्यांनी सदर स्थगिती उठविली. त्यानंतर या निधीतील 140 कामांची निविदा प्रक्रिया राबविली गेली.
नगर विकास विभागाने ज्यावेळी मुलभुतच्या कामांना स्थगिती दिली होती. त्यापुर्वी या कामांच्या निविदा प्रशासनाने प्रसिध्द केल्या होत्या. मात्र जेव्हा मुख्यमंत्र्यांन स्थगिती उठविली त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबविली गेली. निविदा प्राप्तही झाल्या. छाननी समितीने निविदा धारकासोबत वाटा-घाटीही केल्या. मात्र, जेव्हा सदर निविदा नव्याने बदलून आलेले आयुक्त दिलीप गावडे यांच्यासमोर मंजूरीसाठी आल्या. त्यावेळी सर्वच कामाच्या निविदा अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा वाढीव दराने आलेल्या पाहुन आयुक्त गावडे आश्चर्यचकीत झाले. सर्वच निविदा वाढीव दराच्या कशा? सदर निविदांना मंजूरी दिली तर वाढीव 4 कोटीचा निधी आणायचा कुठून? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे त्यांनी वाढीव दराच्या निविदांना मंजूरी देण्यास नकार दिला. अंदाजपत्रकीय दराने काम होणार नसेल तर फेरनिविदा मागाव्यात अशा सुचना त्यांनी प्रशासनाल दिल्या. त्यामुळे सदर कामे पुन्हा रखडणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. आयुक्तांनी घेतलेली भुमिका ही महापालिकेच्या आर्थिक हिताची असल्याने स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी दोन कामाबाबत निविदा धारकांशी चर्चा करुन व सदर कामे अंदाजपत्रकीय रक्कमेतच करण्यास राजी केल. त्यामुळे सदर दोन कामाची आयुक्तांनी तातडीने स्थायीकडे शिफारस केली. स्थायी समितीने हे गेल्या स्थायीच्या सभेत निविदांना मंजूरी दिली. त्यामुळे इतर निविदा धारकांनी अंदाजपत्रकीय रक्कमेत काम करण्यास तयार असल्याचे पत्रक प्रशासनाला दिले. 25 लाखांपेक्षा कमी रक्कमेच्या आयुक्तांच्या अधिकारातील 81 कामांच्या निविदांना मंजूरी देण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत शनिवारी मंजूरी मिळाल्यानंतर पुढील कामे सुरु होणार आहेत.
कामात कुचराई नको
पावसाळा तोंडावर आला असल्याने शहरात आपत्ती व्यवस्थापनाची कामे वेगात करण्यात यावी यामध्ये कुचराई केल्यास सहन केले जाणार नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांनी दक्षता घ्यावी. अशा सुचना आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थानपाबाबत त्यांनी नुकतीच मनपा अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, सहआयुक्त ए.डी.साबळे, अभियंता परिमल निकम, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे, डॉ.पैठणकर, शहरअभियंता सोनटक्के, आर.जी.सातपुते, नगररचनाकार जोशी, अतिक्रमण विभागप्रमुख इथापे, फायरफायडर प्रमुख मिसाळ, वाघ तसेच सर्व प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
