जलव्यवस्थापनासाठी आता हिवरेबाजारचे नाव
। हिवरे बाजार येथे ग्रामीण पर्यटन केंद्र इमारतीचे राज्यपाल सी.विद्यासागर यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर, दि. 02 - राज्याच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन, पाणलोटक्षेत्र विकासाच्या माध्यमातून खालावलेली भूजलपातळी उंचावण्यासाठी प्रयत्न, जलयुक्त शिवार योजनेत प्रत्येक गावाच्या सहभागासोबतच वनीकरणाचे काम एक मिशन म्हणून हाती घ्यावे लागणार आहे. हिवरे बाजार जलसंवर्धनाचे आदर्श मॉडेल आहे, हिवरे बाजाराचा आदर्श ठेवून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दीष्ट गाठता येईल, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हिवरेबाजार येथे व्यक्त केला.हिवरे बाजार येथे केंद्र व राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत ग्रामीण पर्यटन केंद्र इमारतीचे उद्घाटन व जलयुक्त शिवार चर्चासत्र कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंजुषा गुंड, खा. दिलीप गांधी, जिल्हा परिषद सदस्या कालिंदी लामखडे, पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, सदस्या उज्वला कापसे आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, हिवरे बाजारला आल्यामुळे आज मनस्वी आनंद झाला. गावातील नागरीकांशी संवाद साधता आला. राजभवनमध्ये नुकताच पोपटराव पवार यांचा गौरव केला, हा सन्मान आपल्या संपूर्ण गावचा सन्मान आहे. मी आज येथे प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. हिवरे बाजारच्या ग्रामस्थांनी अथक मेहनतीतून गावाचा कायापालट केला आहे. जलव्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल हिवरेबाजारमध्ये पाहायला मिळाले असून दुष्काळाशी सामना कसा करायचा, याचे उदाहरण हिवरेबाजारने संपूर्ण जगासमोर ठेवले आहे. जलव्यवस्थापनाचा विषय ज्यावेळी होत असे त्यावेळी इस्त्रायल देशाचे उदाहरण देत असायचे आता आम्ही हिवरे बाजाराचे उदाहरण संपूर्ण जगाला देवू, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. हिवरे बाजारमध्ये या टंचाई परिस्थितीतही पाणी उपलब्ध आहे. हा चमत्कार फक्त हिवरेबाजारमध्ये पाहायला मिळला. राष्ट्रगीतामध्ये सुजलाम सुफलाम चा उल्लेख आहे, हिवरे बाजारमध्ये या पंक्तीची अनुभुती होते, असे राज्यपालांनी सांगितले
महाराष्ट्रात पर्यटन वाढीची मोठी क्षमता आहे, असे सांगून राज्यापाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जपणूक करावी लागणार आहे. इतिहास वाचायला सर्वांनाच आवडतो, महाराष्ट्रात त्यादृष्टीने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायत व्यवस्थेच्या माध्यमातून गावाचे रुप बदलता येणार आहे. ग्रामसभेला त्यादृष्टीने अधिकार देण्यात आले आहेत, त्या अधिकाराचा उपयोग करुन आदर्श गाव निर्मितीसाठी प्रत्येक गावाने पुढाकार घ्यावा. गावात मिळून मिसळून रहा, जलस्वंयपूर्ण गावाचा निर्धार करा, असे आवाहन त्यांनी केले.
गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले,गेल्या सत्तावीस वर्षापासून गावाने जलसंवर्धनाचे काम केले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र टंचाईमुक्त होईल. कु-हाडबंदी, बोअरवेल बंदीचा हिवरे बाजारने स्वयंस्फूर्तीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. देश शेती प्रधान आहे, खेडयात सुख, शांती आणि आपुलकी आहे, हे टिकविण्यासाठी खेडी समृध्द झाली पाहिजेत आणि खेडी समृध्द कारण्यासाठी हिवरे बाजारचा आदर्श घेतला पाहिजे. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, पाणलोट विकासाची चळवळ गतिमान होत आहे. आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून राज्यातील शंभर गावातही ही प्रगती दिसू लागली आहे. गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी गावातील लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही पवार यांनी सांगितले.
