Breaking News

राज्य शासनाचा जलयुक्त शिवार अभियान

। हा एक क्रांतिकारी कार्यक्रम - पोपटराव पवार

अहमदनगर, दि. 02 - शासनाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हा एक क्रांतिकारी कार्यक्रम आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कम्पार्डमेंट बंडिंग व डीप सीसीटी हे सर्वांत उपयुक्त उपचार आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत ठिकठिकाणी नाला खोलीकरण, रुंदीकरण, कम्पार्टमेंट बंडिंग, डीपी सीसीटीची कामे सुरू आहेत. ही कामे चालू असताना लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थांनी कामाच्या गुणवत्तेबाबत सतर्क रहावे, असे प्रतिपादन आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चास (ता. नगर) येथे कम्पार्टमेंट बंडिंगच्या कामाची आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार व प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी पाहणी केली. यावेळी श्री. पवार बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी सहाय्यक उमेश शेळके, दत्तात्रय कार्ले, नामदेव सासवडे आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, प्रथमच गावातील लोकांना जलयुक्तच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला आहे. हा मृद्संधारणाचा कार्यक्रम असून, या कामामुळे पाण्याचे 100% पुर्नभरण होते. डीपी सीसीटी व कम्पार्टमेंट बंडिंग यांची कामे व्यवस्थित झाली, तर गावातील लोकांना टँकरमागे पळण्याची गरज राहणार नाही. राज्यकर्त्यांचा उद्देश निधी उपलब्ध करून देणे आहे. गुणवत्तापूर्ण काम होण्यासाठी अधिकार्‍यांबरोबरच गावकर्‍यांनीही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.
बर्‍हाटे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चास परिसरातील 967 हेक्टरवर कम्पार्टमेंट बंडिंगची कामे प्रस्तावित असून, त्यापैकी 520 हेक्टरवरील कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. या कामामुळे पाणीसाठा वाढेल. परिणामी संरक्षित पाणी उपलब्ध होऊन परिसरातील हजार ते बाराशे शेतकर्‍यांना याचा लाभ होईल. खरिपामध्ये शाश्‍वत पीक घेता येईल, असे ते म्हणाले.