Breaking News

सरपंच मानकर यांचा जि.प. समोर आत्मदहनाचा प्रयत्न

बुलडाणा, दि. 02 - गावातील महाजल योजनेच्या संदर्भात असणार्‍या अडचणी बर्‍याच दिवसांपासून दुर झाल्या नाहीत म्हणून आज दि.1 जुन रोजी गावच्या सरपंचानेच जि.प.समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली.
जळगाव जामोद तालुकयातील हिंगणा बाळापूर येथील सरपंच गजानन मानकर यांनी आज 1 जनु रोजी जिल्हा परिषद समोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतू पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला गेला. गावाच्या महाजल योजनेतील अनियमितता दुर करावी अशी सरपंच मानकर यांची मागणी आहे. हिंगणा बाळापूर ता.जळगांव जामोद यथ सन 2010 मध्ये महाजल योजनेसाठी 17 लाख रुपये शासन स्तरावरुन पुरविण्यात आले. परंतू महाजल योजनेचे काम अर्धवट करण्यात आले. असा सरपंच मानकर यांचा आरोप आहे. तत्कालीन पाणी पुरवठा समितीने ग्रामसभेचे खोटे ठराव सादर करुन कागदोपत्री काम केले. या गैरकारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी  सरपंच मानकर यांची होती. या मागणीसाठी त्यांनी 4 एप्रिल रोजी 4 दिवस जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते. तेव्हा प्रशासनाने लवकरच हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू अद्यापही त्यावर कारवाई न झाल्याने सरपंच मानकर यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापूर्वीच उपस्थित पोलीस कर्मचारी अमरसिंग राजपुत आणि संजय दुबे यांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले व बुलडाणा पोस्टेला नेले. पोलीसांनी समज देवून त्यांना सोडण्यात आल्याचे समजते.