Breaking News

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनास प्राधान्यः गृहराज्यमंत्री

बुलडाणा, दि. 03 - शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते गुणवत्तापूर्णक असायला पाहिजे. त्यसाठी शिक्षण व्यवस्था प्रबळ करणे अत्यंत गरजेचे आहे.  शिक्षणाचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना शिक्षण संस्था चालकांवर मोठी जबाबदारी आली आहे. त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न समोर आला आहे. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे. 
शारदा कॉन्व्हेंट शाळेच्या सभागृहात शिक्षण संस्थाचालकांची सहविचार सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी माध्यमिक अ. ज सोनावणे, संस्थाध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, ड गणेश कविमंडन, रामकृष्ण शेटे, विजयाताई राठी, विश्‍वनाथ माळी, डॉ. खबुतरे, श्री. गावंडे, श्री. उबरहंडे आदी उपस्थित होते.
शिक्षकांचे वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती करण्यासाठी यापुढे पेपरलेस पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे सांगत राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती करण्यासाठी शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. पेपरलेस पद्धत केल्यामुळे शिक्षकांचे देयक सहज अदा करता येणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षण संस्थांना वेतनेतर अनुदान पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे सध्या देण्यात येते. त्यामध्येही सुधारणा करून ते नवीन वेतन आयोगाप्रमाणे करण्याचा प्रयतक् करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, शिक्षणाचा अधिकार कायद्यामुळे परीक्षांमधून विद्यार्थ्यांची मुक्तता करण्यात आली होती. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना परीक्षांची चाळणी असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन इयत्ता 3 री, 6 वी आणि 9 वी साठी चाळणी परीक्षा आणणार आहे. यासंदर्भात कार्यवाहीसुद्धा लवकरच करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी शाळेचा दाखला सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच टीसीची आवश्यकता असते. मात्र काही शाळा टीसी देण्यास पालकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास देतात. त्याकरिता सरकार प्रवेशासाठी टीसीची अट शिथील करणार आहे. त्यामुळे या प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. तसेच अडचणीत सापडलेल्या मराठी शाळा टिकविणे शासनाची जबाबदारी आहे. शासन मराठी शाळा टिकविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयतक् करणार आहे.
यावेळी उपस्थित संस्थाध्यक्षांनी आपले विचार व्यक्त केले. शिक्षणाधिकारी श्री. सोनावणे यांनीही मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव उबरहंडे यांनी केले. संचलन ज्ञानेश्‍वर चव्हाण यांनी तर आभार बी.टी भारसाकळे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थाचालक, शिक्षक आदी उपस्थित होते.