Breaking News

येत्या दहा दिवसात मंत्रिमंडळ विस्तार!

मुंबई, दि. 06 -  राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर वेग आला असून मंत्रिमंडळ विस्तार येत्या दहा दिवसात होण्याची शक्यता आहे. सगळे पत्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे राखून ठेवल्यामुळे मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी देऊन, मुख्यमंत्री धक्का देण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांच्या नावाची येत्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी नेहमीप्रमाणे चर्चा आहे.
दरम्यान, भाजपची आज खडसेंच्या राजीनाम्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संघटनमंत्री व्ही सतीश सहभागी होणार आहेत. या बैठकीला एकनाथ खडसेही हजर राहण्याची शक्यता आहे. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 12 आणि 13 जूनला अलाहाबादमध्ये होत आहे. तर राज्यातील कार्यकारिणीची बैठक 18 आणि 19 रोजी पुण्यात होणार आहे. त्यामुळे या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.