Breaking News

गायींची वाहतूक करणार्‍या तिघांना जबर मारहाण

प्रतापगढ (राजस्थान), दि. 03 - अजूनही गो-मांसाचा मुद्दा आणि त्यावरून झालेला हिंसाचार चर्चेत असतानाच राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर 96 गुरांची वाहतूक करणारे दोन ट्रक राजस्थान पोलिसांसह सुमारे 150 जणांच्या जमावाने अडवून गो वाहतूकदारांना जबर मारहाण केली.
बजरंग दल आणि गो रक्षा समितीचे समर्थक या जमावात सामील होते. राजस्थानातील जयपूर आणि अजमेर येथून खरेदी केलेली गुरे घेऊन सदर ट्रक गुजरात आणि महाराष्ट्रातील कत्तलखान्यांकडे चालले होते. एक ट्रक पोलिसांनी जप्त केला परंतु दुसरा ट्रक जमावाने ताब्यात घेत त्यातील एका वाहतूकदाराला खाली खेचून झोडपून काढले. एकूण सात वाहतूकदारांना आणि एका हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून एक जण पळून गेल्याचे प्रतापगढ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक काळू राम रावत यांनी सांगितले. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस गणवेश घातलेली एक व्यक्तीही या जमावामध्ये आढळून आल्यामुळे मारहाण करण्यामध्ये पोलिसही सामील असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, हा आरोप रावत यांनी फेटाळून लावला. किंबहुना, चित्रीकरणात दिसत असलेला पोलिस अधिकारी हा प्रत्यक्षात या गो वाहतूकदारांना जमावापासून वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा रावत यांनी केला आहे.