Breaking News

मथुरेत पोलिसांवर आंदोलनकर्त्यांचा हल्ला

मथुरा, दि. 03 - कथित आंदोलनकर्त्यांनी सदर पोलीस ठाणे क्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये स्टेशन ऑफिसर संतोष कुमार यादव यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरता आगर्‍याला पाठवले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर बारा शिपाई जखमी
झाले आहेत. यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात 12 आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी 12 आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे. यानंतर सरकारी जमीन खाली करण्यात आली. काही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
सामाजिक संघटना व पोलिसांमध्ये यापुर्वी देखील तीव्र मतभेद झाले होते. पोलिसांवर सामाजिक कार्यकर्त्यांनी बांगड्या फेकून विरोध प्रदर्शित केला होता. तसेच आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकाराची माहिती मिळताच काही ठाण्याच्या पोलिसांना, कंपन्यांचे पीएसी आणि आरआरएफला तैनात करण्यात आले होते. शहर दंडाधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जवाहरबाग खाली करण्याची मुदत देण्यात आली होती.