अमेरिकेतील विमान बनविण्याच्या स्पर्धेत नगरच्या प्रितेश बजाजचे यश
। ...आणि ’गरुडाश्व’ अवकाशात झेपावले
अहमदनगर, दि. 02 - नुकत्याच अमेरिकेतील लॉसअँजेलीस येथे विमान डिझाईन करून व निर्माण करून रिमोट कंट्रोलद्वारे चालणार्या विमानाची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नगरच्या प्रितेश बजाज व टीमने तयार केलेल्या विमानाने अवकाशात यशस्वी उड्डाण केले व स्पर्धेत यश मिळविले.प्रितेश बजाज हा पुणे येथे एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. अमेरिकेतील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरने (एसएएफ) विमानासंबंधीचे डिझाईन तयार करून विमान बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यात जगभरातून 75 टीम सहभागी झाल्या होत्या. पश्चिम अमेरिकत झालेल्या या स्पर्धेत भारतातून 12 टीमची निवड करण्यात आली होती.
प्रितेश बजाज शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमधून टीम ’गरुडाश्व’ची निवड झाली होती. या टीममध्ये प्रितेशसह 13 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यातील 6जण प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी अमेरिकेस गेले होते. या टीमला प्रॉडक्शन, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्सच्या विभागप्रमुखांचे, तसेच प्राचार्य ए. पी. दानव यांचे मार्गदर्शन लाभले. यावर्षी अमेरिकेतील लॉसअँजेलीस (कॅलिफोर्निया) येथे ही स्पर्धा एप्रिल 2016मध्ये घेण्यात आली. पहिल्या दिवशी सहभागी टीमनी विमानाचे डिझाईन सादर केले. तांत्रिक तपासणी, विमानाच्या डिझाईनची कन्सेप्ट व इतर पॅरामिटर्सची तपासणी परीक्षकांनी केली. यात विविध पैलूंचे सादरीकरण, वापरलेले मटेरिअल, कंट्रोल सिस्टिम, वजन आदींचा समावेश होता. स्पर्धेच्या तिसर्या दिवशी विमानांची प्रत्यक्ष उड्डाण चाचणी घेण्यात आली.
टीम गरुडाश्वने तयार केलेले विमान 58 इंच बाय 90 इंच बाय 21 इंचाचे होते. विमानाची क्षमता ही 10 किलो वजन वाहून नेण्याइतकी होती. विमान उडवणे व उतरवणे, त्यासाठी लागणारा वेळ, ठरवून दिलेल्या उंचीपर्यंत विमान नेणे, तसेच 10 किलो वजन वाहून ठरवून दिलेल्या वेळेत विमान लोड करून पुन्हा विमान उडवणे या बाबींचा प्रात्यक्षिकात समावेश होता. टीम गरुडाश्वने या सर्व चाचण्या पार केल्या.
टीम गरुडाश्व ही महाराष्ट्रातून या स्पर्धेत सहभागी होणारी एकमेव टीम होती, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून सहभागी होणारी ही पहिलीच टीम होती. गरुडाश्वने भारतातून सहभागी झालेल्या सर्व टीममधून प्रथम व जगभरातून 18वा क्रमांक मिळविला. हे यश संपादन करण्यासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली व अनेक अडचणींचा सामना केला. या टीमला मुंबई विमानतळावर ट्रान्समीटर घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला. विमानातील हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट असल्याची जाणीव करून दिली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. आपल्याच देशात अशाप्रकारे अडवणूक होते याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. शेवटी ट्रान्समीटर न घेता अमेरिकेस ही टीम रवाना झाली. तेथे गेल्यानंतर अथक शोधमोहीम यशस्वी होत ट्रान्समीटर उपलब्ध झाला व सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. गरुडाश्व टीमला एन.सी.सी. एरोमॉडेलिंगचे धनंजय ढमाले व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. हायटेक इंजिनिअर्स व बजाज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे विनोद बजाज यांचा प्रितेश चिरंजीव आहे. प्रितेश याचे नगर व राहुरीच्या एमआयडीसीतील उद्योजकांनी अभिनंदन केले आहे.
