Breaking News

विद्यार्थ्यांनी शेतीशी आपले नाते जोडावे ः सचिन जगताप

। जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंतांचा जिल्हा परिषद सदस्य जगताप यांच्या हस्ते गौरव

अहमदनगर, दि. 08 - फुले दाम्पत्यांनी आपणास शिक्षणाची दारे खुली करून दिली. ही दारे खुली करून देताना त्यांना खूप अडचणींचा सामना करीत त्रास सहन करावा लागला. समाजाला तोंड द्यावे लागले. हे सर्व दिव्य पार करीत अहोरात्र परिश्रम घेत राहिले. त्यांच्यामुळेच आज आपण शिक्षण घेऊ शकत आहोत. तरुण पिढी फॅशनच्या दुनियेकडे आकर्षित होत असून, वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय सोडून ती भरकटत आहे. शेती हे व्यवसायाचे उत्तम साधन आहे. विद्यार्थ्यांनी शेतीशी आपले नाते जोडले पाहिजे, असे प्रतिपादन जि. प. सदस्य
सचिन जगताप यांनी केले.
जय पार्वतीमाता ज्युनिअर कॉलेजमधील 12 वीच्या परीक्षेत यश संपादन करणार्‍या गुणवंतांचा सत्कार जि. प. सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. जगताप बोलत होते. यावेळी नीलेश बांगरे, नंदकुमार गोरे, सरपंच गौरव दरेकर, सुहास शिरसाठ, सुरेश बनसोडे, गजानन भांडवलकर, राहुल आल्हाट, राहुल कटारे, वैभव सुडके, समीर खान, विशाल आठवले, मुख्याध्यापिका मृणाली गोरे, उपमुख्याध्यापिका रझिया इनामदार आदी उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले की, मुलांपेक्षा मुलींनी यावर्षी बाजी मारली आहे. ही एक कौतुकाची बाब आहे. शिक्षण क्षेत्रआत आमूलाग्र बदल झालेला आहे. शेतीची आवड कमी होत चालली असताना शिक्षण घेताना त्यामध्ये शेती हा विषय असणे आवश्यक आहे. आपणही समाजाचं काही देणं लागतो याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. आई-वडिलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम केले, तर निश्‍चित यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. प्राचार्य मृणाली गोरे म्हणाल्या की, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये शिक्षण दिले आहे. अतिशय कमी फीमध्ये शिक्षण दिले आहे. अशा अनेक अडचणी पार करीत विद्यालय यशाकडे वाटचाल करीत आहे. यावर्षी विद्यालयाचा 12वी विज्ञान शाखेचा निकाल 98.33%, आर्टस्चा निकाल 93% व कॉमर्सचा निकाल 96% लागला आहे. यामध्ये मुलींनी मोठी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेत पूनम दरेकर (प्रथम), प्रतीक्षा मुळीक (द्वितीय), अश्‍विनी गावडे (तृतीय), आर्टस्मध्ये श्यामल तापकीर (प्रथम), शुभम भिंगारदिवे (द्वितीय), ऋषिकेश माताडे (तृतीय), तर, वाणिज्यमध्ये भाग्यश्री जरे (प्रथम), हर्ष मुनोत (द्वितीय), काजल पवार (तृतीय) यांनी यश संपादन केले आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजिया इनामदार यांनी केले  तर आभार रोहिणी दशके यांनी मानले.