अपघातांचे वाढते प्रमाण !
महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, त्याला मानवी चुका मोठया प्रमाणात कारणीभूत आहेत, मात्र आपण सरकारी यंत्रणांना दोष देत आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळेच अपघात कमी होण्याऐवजी वाढतच आहे. कालच मुबंई- पुणे दु्रतगतीमार्गावर झालेल्या अपघातात 17 जणांचा हकनाक बळी गेला आहे. याच मुबंई पुणे महामार्गावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, सरकारी उपाययोजना, मानवी चुका होणार नाही, याची जर आपण दक्षता घेतली तर नक्कीच अपघातांचे प्रमाण कमी होईल. भारतात रस्ते अपघातात मृत्यू पावणारांची संख्या दहशतवादामुळे होणार्या मृत्यूपेक्षा चारपट जास्त आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार दोन वर्षात रस्ते अपघतामुळे होणार्या मृत्यूत घट झाल्यानंतर 2015-2016 मध्ये या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. यातील बहुतांश मृत्यू वाहन चालकाच्या चुकीमुळे झाले आहेत. एका अंदाजानुसार रस्त्यावर होणार्या मृत्यूपैकी बहुतांश अशा कारणांनी होतात जे थांबवले जाऊ शकतात. जसे की वाहनाचा भरधाव वेग, दारू पिऊन वाहन चालवणे आणि वाहनात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा माल असणे. या पाच कारणांवर लगाम लावून रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यू कमी करता येऊ शकतात. भारतीय रस्त्यावर होणार्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण भरधाव वेग आहे. वाहनांची गती थोडी कमी करून खूप प्रमाणात रस्ते अपघात टाळता येतात. रस्ते सुरक्षेसाठी समर्पित अमेरिकेतील एक संघटना ए.ए.ए. फाउंडेशनद्वारे प्रायोजित एका अभ्यासानुसार 37 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार्या कारची धडक बसल्यावर पादचार्याच्या मृत्यूचा धोका 10 टक्के असतो. मात्र हा धोका वाहनाच्या गतीसह खूप वाढू शकतो आणि भरधाव वेगात हा धोका 90 टक्क्यांवर जातो. विशेषतः महामार्गावरील गती शहरातल्या तुलनेत खूप जास्त असते. महामार्गावरील वेगमर्यादेवर कडक बंधन घालून हजारो जीव वाचवता येतात.- भारतीय महामार्गावर सामान्यापेक्षा जास्त भरलेले आणि वेगाने धावणारे ट्रक सर्रास असतात. क्षमतेपेक्षा जास्त भरलेले हे ट्रक प्रतिदिन 100 लोकांचा बळी घेतात. 2014 मध्ये या दोन्ही कारणांमुळे 36,543 जणांचा जीव घेला होता. धेन्ही कारण असे आहेत, ज्यावर अकुंश लावता येईल. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणेही रस्त्यावरील अपघाताचे एक मोठे कारण आहे. मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये होणार्या मृत्यूपैकी एक चथुर्तांश दारू पिउन गाडी चालवल्याने होतात. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात पोलिस दारू पिऊन वाहन चालवणार्याविरोधात मोहिम चालवत असते. भारतीय रस्त्यावर सर्वाधिक धावणार्या दुचाकी वाहनांमुळेही बरेच मृत्यू ओढावतात. जागतिक आरोग्य परिषदेनुसार हेल्मेट घातल्याने घातक इजा 72 टक्के आणि मृत्यूचा धोका 39 टक्के टाळता येतो. 16,000 पेक्षा अधिक सायकलस्वार आणि पादचार्यांचा मृत्यू पाहता मोठ्या वाहनांपासून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी व्यावहारिक धडे देण्याबरोबरच त्याला अनुकूल रस्ते आणि पायी पारपथ बनवणे आवश्यक आहे. 2015 मध्ये भारतातील 50 मोठ्या शहरांत रस्ते अपघातात 16,611 मृत्यू झाले, यात दिल्ली, चेन्नई आणि मुंबई सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत, मात्र दिल्ली आणि चेन्नईमध्ये मृत्यूची संख्या सातत्याने घटली आहे, ते केवळ मेट्रोच्या सुरक्षित प्रवासामुळे. त्यामुळे मानवी चुका टाळत, जनजागृती करत आपण यावर नक्कीच मात करू शकतो.
