Breaking News

ऐतिहासिक वास्तुचा प्रसार होण्यासाठी पुस्तिकेचे प्रकाशन

अहमदनगर, दि. 04 - अहमदनगर शहरामध्ये बर्‍याच ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत, पण आम्हा नगरकरांनाच त्या वास्तू बद्दल माहिती नाही, त्या कोठे आहे. त्याचा इतिहास काय आहे. याची आम्हाला जाणिव राहिलेली नाही. म्हणूनच आमच्या मुलांनामध्ये इतिहासाबद्दल फार उत्सुकता दिसून येत नाही व त्याच बरोबर शहराच्या पर्यटनामध्येही वाढ होताना दिसत नाही. आपण सर्वांनी अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंचा प्रसार व प्रचार करायला हवा, असे प्रतिपादन इंजि.अनिस शेख यांनी केले.
अहमदनगर शहराच्या 526 व्या स्थापनादिनानिमित्त मखदुम सोसायटीच्यावतीने अहमदनगर शहराचे जनक अहमद निजाम शाह यांना अभिवादन करुन शहरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती असलेल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, युनूस तांबटकर, इंजि.अनिस शेख, डॉ.सईद काझी, प्रा.विठ्ठल बुलबुले, शफाकत सय्यद, एजाज खान आदि  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलताना अनिस शेख म्हणाले की, आपल्याकडे येणार्‍या पाहुण्यांना आपण फक्त चांदबिबीचा महाल किंवा किल्ला एवढेच दाखवतो ही आमची चुक आहे. आम्ही त्यांना शहरातील इतर ऐतिहासिक वास्तूही दाखवली पाहिजे. वस्तू संग्राहलय दाखविले पाहिजे, ज्यामुळे शहरातील सर्व वास्तूंची माहिती सर्वांना होईल. अनेकांना आपल्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंची माहितीही नाही तेव्हा अशांसाठी या पुस्तकांचा चांगला उपयोगी होऊ शकतो व इतर वास्तूंचा इतिहास कळेल व आपल्या शहराचे ऐतिहासिक महत्व सर्वदूर जाईल.शफाकत सय्यद म्हणाले, शहरातील सर्व शाळांची वर्षातून एकदातरी मुलांना सर्व ऐतिहासिक वास्तूंची सहलीचे आयोजन केले पाहिजे, ज्यामुळे मुलांना शहरातील वास्तूंची माहिती होईल.  कार्यक्रमाचे प्रास्तविक अंकाचे संकलन करणारे आबीद दुलेखान यांनी केले. सूत्रसंचालन राजूभाई शेख यांनी केले तर आभार नादीर खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मखदुम सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.