’एनआयएफटी’च्या अध्यक्षपदी चेतन चौहान
नवी दिल्ली, दि. 18 - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एनआयएफटी) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू आणि दोन वेळा खासदार झालेले चेतन चौहान यांची निवड करण्यात आली आहे. चौहान हे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सदस्यपदही त्यांनी भूषविले आहे. याशिवाय ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार होते. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी एनआयएफटीच्या निवडीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानले. एनआयएफटीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. एनआयएफटीच्या 2006 मधील घटनेनुसार नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ किंवा वैज्ञानिक किंवा तंत्रज्ञ किंवा व्यावसायिकाची निवड करण्यात येते.
