मनपा कर्मचारी पतसंस्थेला टाळे
। उपनिबंधकाच्या आदेशाला विलंब । सभासदात संताप
अहमदनगर। प्रतिनिधी । 05 - पतसंस्थेच्या सभासदांना लाभांशाची रक्कम रोखीने न देता क्रॉस चेक अथवा बँक खात्यावर जमा करण्याची यावी असे आदेश नगर तालुका उपनिबंधकांनी देवूनही त्याबाबत कार्यवाही करण्यास विलंब केला जात असल्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांनी पतसंस्थेच्या कार्यालयास टाळे ठोकले.पतसंस्थेच्या संचालिका नंदा भिंगारदिवे, विजय बोधे, कैलास चावरे, बलराज गायकवाड, ऋषिकेश वाल्मीक, दत्ता फटांगरे आदींनी हे आंदोलन केले. पतसंस्थेच्या सभासदांना लाभाशांची रक्कम क्रॉस चेकने अथवा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबतचे आदेश पतसंस्था व्यवस्थापनाला द्यावेत, अशी मागणी या आंदोलकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. नगर तालुका उपनिबंधकांनी रोखीने लाभांश वाटप नियमबाह्य असल्याने पतसंस्थेच्या चेअरमन व व्यवस्थापकांना पत्र देवून लाभांशाची रक्कम क्रॉस चेक अथवा बँक खात्यांवर वर्ग करण्याचे आदेश दिले होते. मात्र पतसंस्थेकडून या कामास जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचा सांगत सभासदांनी पतसंस्थेच्या कार्यालयास टाळे ठोकले. याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आंदोलनाचा इशारा यावेळी सभासदांनी दिला.
