Breaking News

ग्रामीण रूग्णालयास आरोग्यमंत्री सावंत यांची भेट

। नोव्हेंबरपासून सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना । अपघात ग्रस्तांना मोफत उपचार

 सुपा । प्रतिनिधी । 05 - राज्यातील शेतकर्‍यांसह ज्या लोकांनी अपघात विमाकाढलेला नाही, त्यांच्यासाठी नोव्हेंबरपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना राबविण्यात येणार असून, त्याचे नियोजन सुरू असून यात अपघातग्रस्तांना खाजगी रूग्णालयात तीन दिवस मोफत उपचाराची सुविधाविचाराधिन असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी पारनेर ग्रामीण रूग्णालयास भेट प्रसंगी सांगीतले.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी  दुपारी पारनेर ग्रामीण रूग्णलायात भेट देऊन येथील आरोग्यसुविधांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की,अनेक शेतकरी किंवा सामान्य माणूस अपघाताचा विमा काढु शकत नाही. त्यांच्यासाठी अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. राजीव गांधी जीवनदायीनी विमा योजनेतसामान्य रूग्णांना ह्रदयविकारात आणखी सुविधा देणार आहेत . तसेच गुडघ्यावरील शस्त्रक्रिया, किडनी देणार्‍याच्या औषधोपचाराचा खर्च या योजनेत येणार आहे. राज्यात सुमारे दोन हजार दोनशे एम.बी.बी.एस. डॉक्टरांची भरती केल्याचे त्यांनी सांगीतले. पारनेर ग्रामीण रूग्णालयातील सर्व विभागांची त्यांनी पाहणी करून रूग्णांची विचारपुस केली. वैद्यकीय अधिकारी डॉ.उंदरे, डॉ.अवनित भोंडवे यांनी त्यांना माहिती दिली. आमदार विजय औटी यांनी वैद्यकीय अधिकारी व इतर सुविधांबाबत त्यांच्याशी चर्चा केल्यावर पारनेर ग्रामीण रूग्णालयात सर्व सुविधा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सोनवणो, 108चे जिल्हा व्यवस्थापक डॉ.नरेंद्र मुळे , सेनेचे शहरप्रमुख नीलेश खोडदे, शिवाजी औटी आदी उपस्थित होते.